Sunday, March 25, 2007

आपला चषक हरवलाय

विश्वचषक तो जिंकण्या निघाले अमुचे शूरवीर
द्रविड तो अग्रस्थानी, सरसावूनी आपुले कमान-तीर

सोबत होत्या शुभेच्छा, होते अपेक्षांचे ओझेही
ज्योतिष्यही पाठिशी, आले यज्ञकर्ते साधूही

अवघ्या देशाचे पाठबळ, आशिर्वादाची भली मोठी शिदोरी
अनुभवही कमी नसे, जगज्जेत्यांनी भरली पोतडी

कॅरिबियनला पोचताच सगळे अस्त्र शस्त्र परजले
विंडिजला धूळ चारली, हॉलंडपुढेही आवेशात गरजले

वाटले, अहा, काय जंगी सुरुवात झाली
कप नाही, पण सेमी फ़ायनल तर नक्कीच आपली झाली

पण, पण नशिबाने ऎन वेळी इंगा दाखवला
नशिब म्हणता की डेव्हिडने मदमस्त गोलियाथ हादरवला?

उमटले पडसाद, त्या यःकश्चित ढोनीच्या घरापुढे
तरीही धीर मंडळीस, खेळतील नक्कीच यापुढे

मागल्या वेळेसही होती अशीच डळमळीत सुरुवात
पण झुंजार दादांनी मारले फ़ाइनलपर्यंत हात

बर्म्युडाविरुद्ध फ़ुकलेले रणशिंग ऎकुन सर्व सुखावले
पण हाय, श्रीलंकेपुढे कागदी धुरंधर पत्त्यांप्रमाणे कोसळले

अब्ज जनता दिःड्मुढ झाली,त्यांचे देव हरले
दोघांनी सोडले प्राण, उरलेले जखमा कुरवाळीत बसले
(आजच टाइम्स मधे न्यूज वाचली)

दोष कुणाकुणाला द्यावा,स्वतःच म्हणती आम्ही त्या लायक नाही
कॅचेस सोडुन हसता लेकहो, तुम्हाहून कुणी नालायक नाही
(बांगलादेश विरुद्ध ढोनीने मुनाफ़च्या बोलिंगवर कॅच सोडली तो क्षण. त्या बॅट्समनने मग पुर्ण मॅच काढली..)

ब्रॅंड ऍंबेसेडर म्हणुन दिवसरात्र झळकत राहणार
पैसा धुळीसारखा उडतो, मैदानावर पायधूळ उगाच कोण झाडणार

परत नवी सुरुवात करण्याची हीच वेळ आहे
भ्रष्ट नीती डावलून पारदर्शकतेची आली वेळ आहे
राखेतून फिनिक्सचा जन्म होण्याची आता गरज आहे
दुर्दम्य इच्छा, निष्ठा अंगी बाणवण्याची गरज आहे

वाटत असेल, मीच का बरळतोय, सगळ्याच्या ह्याच भावना हो..
स्वप्न सुरु होताच भंगले, अवघा देश जागा झालाय
काय करावं, शेवटी आपला चषक हरवलाय, आपला चषक हरवलाय...

Friday, March 23, 2007

स्वप्न

काल समोरच्या वळणावर तू दिसलीस, खुप दिवसानंतर
हर्षले मन, धावत सुटलो मी, त्या आठवणीनंतर

गाठले तुला, हाय, पण ती तू नव्हतीस
परत सगळं जुळवत बसलो,तुटलेल्या स्वप्नानंतर

असं रोजच का होतं, मला उमजत नाही
रोज वाटतं, तू भेटशील त्या वळणानंतर

आठवणींचा पसारा खुप मोठा,आवरणे मला शक्य नाही
नव्या पण कशा येणार, त्याना जागा जुन्या विसरल्यानंतर

माझी अवस्था नदीसारखी, तीसुद्धा धावत असते सागरामागे
तिलाही कल्पना नसते, तो उभा अनंत वळणानंतर

का मी चातकासारखा?, त्यालाही वाट पावसाची
पाउसही तसाच, तोही येतो जमीन होरपळल्यानंतर

नाही म्हणता मी एक भक्तच, पण माझा देव रुसलाय
निरागस मनाची प्रार्थना, ती फ़ळेल फ़क्त भेटीनंतर

बघा माझेही किती सोबती आहेत
भंगलेलं स्वप्न जुळवण्यात सगळे रमले आहेत
स्वप्न खरं होण्याचं स्वप्न आजकाल माझ्या पापण्यात असतं
काय सांगावं, ते प्रत्यक्षात अवतरेलही, डोळे उघडल्यानंतर

Monday, March 19, 2007

senti movie चे रहस्य

अजाण बाळ ते , जन्म होताच रडतसे
जाणता होऊन मग, हसुन अश्रु लपवतसे
थिएटरच्या अंधारात, हा बांध फ़ुटतसे
मन हलकं होताच, परत हसतमुखे तो बाहेर निघतसे

घट्ट दाबलेलं दुःख मोकळं करण्यात,
नाही म्हणता त्या नटाचाही वाटा असतो
हसतात तर लोकं तुमच्या रडण्यालाही
न रडता रडवण्यात, एक सात्विक प्रयत्न असतो

दुःख तर असतंच हो या जगात
समदुःखी कुणी भेटल्यास तेवढंच बरं वाटतं
पिक्चरमधे का असेना,शेवटी आनंदीआनंद दिसतो
स्वप्नं खोटी का असेना,बघताना तेवढंच बरं वाटतं

हीच स्वप्नं मग हसु लेवुन या चेहऱ्यावर सजतात
गोंडस मेक-अप खाली दुःखाचे व्रण हलकेच बुजतात
मनही मरगळ झटकुन मग ऎटित उठतं
आशेची छत्री घेउन तळपत्या उन्हात डौलात बाहेर पडतं

Wednesday, March 14, 2007

एक चित्र

एवढ्यात एक चित्र माझ्या पाहण्यात आलं, त्याला कसला तरी पुरस्कार मिळाला होता. त्यामधे भर उन्हामधे एक छोटं बाळ निपचित पडलं आहे, मृत्युच्या दाराशी जणू. दुष्काळी उन्हाळ्याचा तो एक बळी असावा. आणि एक गिधाड दुरुन त्या मुलाकडे बघत आहे, त्याच्या मरणाची वाट बघत. ते बघून एक विचार आला मनात, तो खाली मांडलाय.


ऊन हसतंय, बेभान हसतंय
एवढं की जमिनीच्या डोळ्यातही पाणी नाही

कुठे आमरस, तर कुठे आईसक्रीम
कुणाकडे मात्र चतकोर भाकरही नाही

कुठे एसी ची थंड झुळुक , फ़्रीजचे गारगार पाणी
मृत्युच येथे कूलर, साधी जगायचीही सोय नाही

फ़िरंगी मंडळीना याचेच मोठे कौतुक
काय समजावं, ही गरिबी एवढी सुंदरही नाही
मोठमोठे पुरस्कार त्या फ़ोटोना लाभतात
जल्लोश करायला येथे स्मशानाचेही भाग्य नाही

Friday, March 9, 2007

मृगजळ

मी तिला रोज पाहतो, पापण्यांच्या आड तिला दडवतो

प्रसन्न सकाळी तिची वाट पाहतो,वाटेवर तिच्यासाठी नयनफ़ुले अंथरतो
ती सहज बागडत येते , मी शांतपणे स्वप्नांचे निर्माल्य गोळा करतो

ती समोर असता नजर हटत नाही,तिची नजर वळता बेभान मन आवरतो
तिच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित,हळुच मनाच्या तिजोरीत साठवतो

काय वर्णावी ती मोहक अदा, जणू परिसाची जादू त्या नयनी
अमृताहून गोड असे वाणी , एका कटाक्षाने मी सुताने स्वर्ग गाठतो

बहुत असती भ्रमर फ़ुलांभोवती,इथे तर साक्षात कमळाचा थाट
प्रत्येक मनी एक आस, मीसुद्धा आशेचा जुगार पणास लावतो

कित्येक रस्तांमधे असा मधेच हरवलो,त्याची मोजदाद कशाला
नवीन खेळ, मात्र कायदे जुनेच, मला परत हरवायला

असु दे तरी, मनाला आवडतो हा फ़सवा लपंडाव
यावेळी तरी पुर्ण डाव जिंकीन, असतो मनी प्रबल भाव
पण पोतडीतला तो धीर,ऎन वेळी चोरवाटे पळ काढतो
उसन्या अवसानाचे ठिगळ जोडुनही, रोज आशेचे लक्तरं फ़ाडतो

म्हणून अद्याप तरी मी तिला रोज फ़क्त पाहतो, पापण्यांसोबत मग मनातलेही दडवतो
वाळवंटात का असेना, मृगजळात पोहण्याचे स्वप्न मात्र रोज पाहतो

आमचा ग्रुप

सप्तरंग,सप्तसुर आणि त्रिताल एकदा सहज एकत्र जमले
उगाच नाही, त्यादिवशी एक अनोखे नाते जन्मले

ऑगस्ट महिन्यातली ती एक शुभ्र सकाळ
नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी ते वीर उभे ठाकले
उगाच नाही,पहिल्याच स्वारीत शत्रुने एक सुंदर कमळ अर्पण केले

उमटत होते नव्या मैत्रीचे प्रसन्न स्वर
जणु पहिल्याच बैठकीत सर्व सुर बरोबर लागले
उगाच नाही,न जोहर ना चोप्रा,पण आमचे पिक्चर हिट झाले

धमाल उधळले रंग,दांडियात तर कधी डिस्क मधे
पुणे,महाबळेश्वरच काय तर कोकणही या खेळात सामील झाले
उगाच नाही शक्य,पण ते दोन क्षणही जणु दिवसभर रमले

दिवसभर असे Dumbciचा गोंधळ, लपाछपी सुद्धा चाले
ऑफ़िस की मस्ती की पाठशाला , कंप्लेंट करणारे सुद्धा थकले
उगाच नाही, या खेळातुनच ब्लॉगसारखे महापराक्रम घडले

रोज एक नवीन प्लॅन आखायचा, रचलेला डाव कधी मोडायचा
पण उत्साह काही कमी होईना, उलट आणखी स्फ़ुरण चढले
उगाच नाही,कधी सात्विक कोजागिरी,तर कधी फ़ॅशन शो मधे फ़ंडू पोशाख चढवले

पुण्यातून निघायच्या दिवशी सगळे जण CCDला जमले
कोरं नातं ताणल्या गेल्यानं मात्र अजुनच घट्ट झाले
उगाच नाही तेव्हा,खळाळून हसतानासुद्धा हळुच डोळे पाणावले

Thursday, March 1, 2007

तमस्तुती - 2

तामसी, पातकी वा घातकी असे त्याचे कौतुक होते
अगाध त्या अंधाराचे चुकुनच कधी स्वागत होते

डोळ्यात प्राण आणुन जग त्याची वाट पाहते
'जीवन'दात्या त्या कृष्णमेघातुन मग आशेची नवी पहाट उगवते
पण अतिथी त्या अंधाराचे चुकुनच कधी स्वागत होते

अथांग सागरास मारली असे मिठी
जिद्दी त्या खलाश्याचे स्वप्न मोठे किती
पण निळ्या राजाची कृपाद्रुष्टी कधी बदलते
दुरवरचा काळा ठिपकाच मग आयुष्याचे निशाण उरते
तरिही अकल्पित त्या अंधाराचे चुकुनच कधी स्वागत होते

सोनेरी दिवसासारखे निर्मळ रुप, चंचल रात्र तिचा मुकुट होते
गुलाबी गालावरची गोड खळी, नाजुक तिळाची अजोड सोबत असते
अवखळ त्या अंधाराचे असे चुकुन कधी स्वागतही होते

शेवटी एक स्मरण आपल्या सावलीचे झाले
तळपत्या उन्हातही दुसरे कोण पाठिशी धाऊन आले होते
पण त्या आजन्म सोबत्याचे मीसुध्दा चुकुनच स्वागत केले होते