Tuesday, June 26, 2007

देव आणि 'TV'

देवाने विचार केला, TV घेउन यावा
एवढं त्यात काय आहे, आपणही बघावा

सकाळी भाविक प्रवचनं बघून
देव मोठा खुश झाला
एकापेक्षा एक भेसुर बाबा पाहून
मात्र स्वतःच थोडासा घाबरला

नंतर लागल्या मुख्य बातम्या
ब्रेकिंग न्यूजने धक्काच दिला
आपली मुर्ती दुध पिते कशी
तो स्वतःही विचारात पडला

आल्या मग पौराणिक मालिका
सादर कथा त्या अनामिका
तासभर करमणुकीनंतर कळले
अरे हा वठवतोय आपलीच भुमिका!!

दुपारी होता सनीचा पिक्चर
ते पिक्चर एकाहुन एक बंपर
अचाट शक्तीने देवच वरमला
आता आपलं कसं, विचार करु लागला

त्यालाही मंदिरात जाताना पाहून
देवाच्या जीवात जीव आला
हिरोईनच्या मागे तो आलाय
हा छोटासा तपशील विसरला

मग 'K' सिरियल्स सुरु झाल्या
अफ़लातून स्त्रियांच्या कथा आल्या
नात्यांच्या गोत्यात तो फ़सला
अन फ़ारच संभ्रमात पडला
सत्तरच्या 'बा'ला पंचवीसची पणती
प्रेरणाच्या नवऱ्यांची नाही गिनती
सुनेपेक्षा सासू सुंदर कशी अन
तिनदा मरुन कुणी जिवंत कशी

प्रश्न त्याला सुटता सुटेना
अनोख्या खेळाचे नियम कळेना

पण त्याला एक समाधान झाले
मनुष्यकल्पनेचे कौतुक वाटले
आपली 'क्रिएशन' मोठी हुशार
'विश्व'कर्मा म्हणून त्यास धन्य वाटले

Friday, June 22, 2007

आयुष्य तेच आहे..

संगीता जोशी यांच्या 'आयुष्य तेच आहे' या गझलेवरुन सनिल पांगे यांनी 'मराठी कविता' कम्युनिटी वर चारोळी श्रुंखला सुरु केली आहे... त्यातील माझा अल्पसा सहभाग आपल्यासाठी सादर करतो आहे॥

आयुष्य तेच आहे
कर्तव्याचा मुक्तछंद आहे
उमटले चार निस्वार्थ शब्द
तर ग्रंथ हा मोलाचा आहे

आयुष्य तेच आहे
साश्रु निरोप आहेत
निष्पाप त्या मनाचे
नशिबावर आरोप आहेत

आयुष्य तेच आहे पण
मला त्यानी बदलवलंय
सोपं आहे रुप बदलणं
आरशालाही मी फ़सवलंय..

आयुष्य तेच आहे
डोळ्यात लपलेली स्वप्नं आहेत
हसलो मी चारचौघात जरी
एकांतात हसणारे फ़क्त अश्रु आहेत

आयुष्य तेच आहे
सुखाचे चटके आहेत
दुःखाचे मलम आहे
आपलेच शब्द अन आपलेच अर्थ आहेत

आयुष्य तेच आहे
स्वप्नांचे क्रिकेट आहे
जिंकलो तर ऑस्ट्रेलिया
हरलो तर भारत आहे

आपली शेवटची भेट
शेवटची ती गोड आठवण
आयुष्याच्या या ग्रिष्मातला
तो शेवटचा मुग्ध श्रावण

तू अलगद हात धरलास
मन अलगद आकाशी उडालं
तुझ्या अस्मानी डॊळ्यांमधे
माझं आयुष्य सामावलं

तू अलगद हात धरलास
जणु परिसस्पर्श झाला
संथ, निश्चल जीवनात
चैतन्याचा झरा आला..

तू अलगद हात धरलास
अलगद बाहुत शिरलीस
तुझ्या आरस्पानी मनात
मला दडवून गेलीस...

आयुष्य तेच आहे
उधार श्वास आहेत
तु गेलिस निघून तरी
तुझेच भास आहेत

आयुष्य तेच आहे
स्वप्नांची आरास आहे
रोज नवीन सजावट
हीच मजा खास आहे

आयुष्य तेच आहे
सगळ्यांना हसवतो आहे
डोळ्यात ढग साकळलेत तरी
मुखवट्याला हसणेच आहे

आयुष्य तेच आहे
माळलेले गुलाब आहेत
उमललेले हास्य आहेत
दडलेले काटेही आहेत.

आयुष्य तेच आहे
एक जादुचा खेळ आहे
वेदनेला अलगद विसरण्यासाठी
स्वप्नांचे संमोहन आहे

आयुष्य तेच आहे
नवीन नाती जोडणे आहे
जुनी द्रुढ करणे आहे
यातच स्वतःलाही जपणे आहे

आयुष्य तेच आहे
स्वप्नांमागे धावायचे आहे
ती भासतात मात्र दुर
पण त्यातच तर खरी मजा आहे

Sunday, June 17, 2007

परत रात आली..

परत रात आली, सुगंधी स्वप्नं घेऊन
तिला भेटायचं एकांती, सर्व बंधनं तोडुन

चांदण्याही उतरल्य़ा होत्या मग धरणीवर
कसं राहवेल त्याना,चंद्राला मजसवे सोडुन

खरं तर पावसालाही सांगुन ठेवलंय
बरसू नकोस, ती येण्याची वेळ सोडून

दुसरी स्वप्नंही रागावली,त्याना जागाच नाही
काय करु, आता राहवेना तिला सोडुन

अखंड लयलूट झाली मग प्रेमभावनांची
ओथंबली पहाट, गेली नेत्री दव सोडून

मनाला आहे परिसस्पर्श हा पुरेसा
नाही कुणात जादू ही, एक तिला सोडून

नाही म्हणता म्हणता,
परत रात सरली, गेली जीव अडकवून
परत रात सरली, मला एकटं सोडून

Friday, June 1, 2007

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला

पावसाचं काय, तो नेहमीच येतो
प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला

चांदण्यातही आता मला तीच दिसते
जणू तो चंद्र मला फ़सवून गेला

देवळातही दुसरं काही मागवेना
नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला

मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो
अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला

शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..