Thursday, August 15, 2013

मातृभूमी

मनी जपावी, मातृभूमी
आज स्फ़ुरावी, मातृभूमी.

गौरव शाली, मातृभूमी
कौतुक ल्याली, मातृभूमी

पुराणिकांची, मातृभूमी
नव गाण्यांची, मातृभूमी

अभिमानाची,मातृभूमी
त्या शहिदांची, मातृभूमी

स्वच्छ आरसा, मातृभूमी
जन्माचा वसा, मातृभूमी

जीवन अवघे, मातृभूमी
नमन तुला गे, मातृभूमी

(वृत्त - पादाकुलक)

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

-- अभिजित गलगलीकर - १५ - ०८- २०१३

Friday, August 9, 2013

स्वप्न मागे धावले

पावसाला आसवांनी आज पुन्हा गाठले
वाहणार्‍या भावनांचे, हुंदकेही दाटले

आसमंती ध्वस्त झाले पाखरांचे सोहळे
नेमबाजी साधणारे, हे पारधी नाचले

सोडुनी आराम आता, पांघरावी वादळे
वास्तवाचे सूर्य सारे, संधिकाली तापले

आरशाने पाहिलेला, चेहरा माझा नव्हे
घातकी त्या माणसाला, मी कधीचे सोडले

क्षीण नात्यांचे उसासे, बास झाले यापुढे
कर्मरेखा वाढताना, स्वप्न मागे धावले

वृत्त - कालगंगा

-- अभिजित गलगलीकर - १८-७-२०१३

Wednesday, July 10, 2013

कविता स्फ़ुरे किनार्‍याला

अशी झाली संध्याकाळ
ओलावले मन नभाचे 
निळ्या आकाशात भिनले
आरक्त श्वास क्षितिजाचे

परतण्यार्‍या पावलांना
साद थांबल्या स्वप्नांची
प्रत्येक वळणावर उभ्या
आतुरलेल्या नेत्रांची

ओझरती नजरभेट ही
ओसरलेल्या शब्दांची
या सैरभैर आकाशी
विखुरलेल्या भावनांची

संधिकालीच का यावे
उधाण शांत सागराला
लाटांना सावरताना
कविता स्फ़ुरे किनार्‍याला

- अभिजित गलगलीकर - २३-६-२०१३

स्वैर भावानुवाद. - अपने होंठों पर

स्वैर भावानुवाद. 

ओठांवर साज तुझा यावा
आवाज मंजूळसा यावा

तुझ्या मिठीतल्या आसवांना
आकार मोतियाचा यावा

आटले आता अश्रू माझे
कधी तुलाहि हुंदका यावा

काळोख भस्म करेल असा
घरात तप्त निखारा यावा

तुझ्या कुशीत गझल घडताना
अखेरचा श्वास घेता यावा

१६ मात्रा .

-- अभिजित गलगलीकर -
९-७-२०१३

मूळ गझल 

क़तील शिफ़ाई  

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ 
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ 


कोई आँसू तेरे दामन पर गिराकर 
बूँद को मोती बनाना चाहता हूँ 

 |

थक गया मैं करते-करते याद तुझको 
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ
 |

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा 
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ 


आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये 
मौत भी मैं शायराना चाहता हूँ

|| 

Tuesday, July 2, 2013

उत्तराखंड


उत्तराखंड पूरामधे सगळं गमवलेल्या एका माणसाचे हे चार शब्द.. 

(वृत्त - पृथ्वी). 

नवीन जगणे, जुनीच वचने, अनोखी कथा
असाध्य वळणे, असह्य रुदने अनोखी व्यथा
निसर्ग रुसला, अथांग हसला, लपावे कसे
अतर्क्य घडले, विचार थकले, जगावे कसे

तमास स्फ़ुरली, विचित्र कविता, म्हणावी कशी
मनात रुतली, अशी भयकथा, जगावी कशी
कसे क्षणभरात स्वप्न खचले, धुके दाटले
पराजित मनात खोलवर हुंदके दाटले

लिखाण करता, अचानक मनात स्वप्नांजली
कितीक रडणार, देउ चल मूक श्रध्दांजली
पुरे शुकशुकाट, घेउ उब शीत आचेतुनी
उधाण उसळेल, खेचु नव जन्म राखेतुनी

-- अभिजित गलगलीकर
- २-७-२०१३

Tuesday, June 4, 2013

आत्मिक श्वास

सद्गदित मनाचे सस्मित बहाणे
सांत्वनातून उरले चिरंतन तराणे

आश्वस्त अवस्थेची संथ कहाणी

रात्रस्पर्शातून सुचावी मंद विराणी 

स्वत्व वाहू दे प्रवाहात विचारांच्या

सत्व गोठू दे डोहात संस्कारांच्या

स्वारस्य ओसरूनही जीव ओला

आत्मिक श्वास देहामागे लपला

-- अभिजित गलगलीकर - २-६-२०१३

Thursday, May 30, 2013

आनंदकंद - एक प्रयत्न

शब्दात मांडलेले, सामर्थ्य ओळखावे
वेळीच भावनांना, आकाश दाखवावे

घ्यावी मशाल हाती, डोळ्यात तप्त वाती
दुष्कर्म भस्म होई, तेव्हाच शांत व्हावे

आता पुरे करावे, हे लाड भावनांचे
शब्दात मांडले ते, कर्तव्य आचरावे

उत्तुंग आसमंती, उत्स्फ़ूर्त घे भरारी
श्वासातल्या सुरांनी,अस्मान पांघरावे

डोळ्यात थांबवावे, आभाळ साचलेले
स्वानंद थेंब माझे, स्वच्छंद ओघळावे


वृत्त -- आनंदकंद

-- अभिजित गलगलीकर - २९-०५-२०१३

Monday, May 13, 2013

कामिनी वृत्त - एक प्रयत्न


आज नील आसमंत हो
चांदण्यात धुंद चंद्र हो

सूर लावला मनी तुझा
छंदमुक्त भावगीत हो

तेच स्वप्न काय शोधतो
या युगास उचित ध्येय हो

आज आसवांपल्याड जा
आणि कोवळा वसंत हो

एवढेच सांगतोय 'अभि'
वाचनीय चार शब्द हो ..

-- अभिजित गलगलीकर -- १३-०५-२०१३

Friday, January 4, 2013

ध्यास


विचारांचा आवेग
इच्छापूर्तीचे भास
रम्य मृगजळालाही
सत्याचीच आरास

आतुरल्या स्वप्नांचा
चाकोरीबद्ध ध्यास..
जणू मनात रोखलेला
मनमोकळा श्वास..

हळव्या कातरवेळी
आठवणींची मिजास
कोवळ्याशा सकाळी
मंद शबनमी सुवास

ठेवून जमिनीशी इमान
क्षितिजाची  धरली कास
सांग मज गवसेल का
स्वछ निळेशार आकाश

-- अभिजित गलगलीकर
४-१-२०१३