Monday, April 30, 2007

देवा, घे एकदा अवतार!!

देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
इथे मनुष्याचे राज्य
मंदिरही त्याचीच एक रचना

फ़क्त पाप धुवायचे काम देवाकडे
लडिवाळ ते अभिषेकादी साकडे
परत निघतसे नवीन पाप कर्मण्या
संपता पुण्याचे इंधन, येई मग हवना

दानपेटीस मिळते लाच दहा रुपयांची
बाहेर उभ्या देवाची सोय नाही खायची
रोज भजन असे भिकाऱ्याच्या श्रवणा
एवढे पुण्य असुन का ती वंचना

नुसतीच गीता वाचून कसा मिळनार स्वर्ग
चाललात का कधी परोपकाराचा मार्ग
तहानलेल्याची भागवलीत का कधी तृष्णा
ढोंगी उपासाच्या कसल्या हो वल्गना

देवळात असे भक्तांची वर्गवारी
भक्त तोच महान ज्याचा खिसा भारी
मोठी मजेशीर असे ही संरचना
दुकानदार पुजारी,भक्तीचा भाव उणा

म्हणुन देवा, घे एकदा अवतार
थांबव ही भक्तिची उसनवार
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
माणुसकी जागव रे प्रत्येक मना

Sunday, April 15, 2007

सखे, तुझ्यासाठी

बोलशील ना मज संगे, सखे तू
ऎकवशील ना ह्रुदयगीत मज एक दिन तू

आजकाल फ़ितुर झाली स्वप्नही तुला
राहशील ना त्या स्वप्नमहाली एक दिन तू

जपेन तुझ्या आसवांना मोत्यांसारखे
त्या शिंपल्याचा अवसर मज देशील ना तू

थांबवेन या काळाच्या प्रवाहाला
या अनोख्या संगमास देशील ना प्रत्यक्ष रुप तू

काळोख्या रात्री मी चंद्र पेटवत आहे
चांदणी बनून करशील ना मज सोबत तू

उधळेन आनंदाचे रंग सगळीकडे
त्या होळीचे निमित्त बनशील ना तू

बस,या फ़कीर मनाच्या खुप इच्छा नाही
फ़क्त चिरकाल साथ देणारी आठवण बनशील ना तू

Sunday, April 1, 2007

मनाचे उपद्व्याप..

हातात तुझा हात असावा, नयनी सदा तुच असावी
मनाला तुझ्यावाचून चैन पडेना, त्याल सवे सदा तुच हवी

मन धावतं क्षितिजाकडे, नजर त्याची रोखलेली
हाती काही लागेना,त्याला मात्र हीच वेडी आशा हवी

मन कधी ढग बनुन फ़िरतं, तुला शोधत सगळीकडे
चंचल हवेला चुकवत, कारण फ़क्त तुच भिजायला हवी

मन कधी थांबतं, निपचित पडुन राहतं
फ़िरुन थकलेलं, त्याला तुझी एक झुळूक हवी

दिवसभर आठवणींच्या झळा, मग येते गार कातरवेळ
असेनात असंख्य,पण चांदण्यांपैकी त्याला फ़क्त तुच हवी

मन घेतं रुप मग शिंपल्याचं, घेतं सागरात उडी
एकच आशा,किनाऱ्याच्या रुपात तिथे तु असावी

निघतं उत्साहात प्रवासाला, आठवणींची शिदोरी घेउन
कुठे ते ना ठावे, त्याला फ़क्त तुझी सोबत हवी

मन रमतं शब्दांच्या सहवासात, भान हरवतं
तिथेही त्याला अक्षररुपात तुच रेखाटलेली हवी..