Thursday, May 30, 2013

आनंदकंद - एक प्रयत्न

शब्दात मांडलेले, सामर्थ्य ओळखावे
वेळीच भावनांना, आकाश दाखवावे

घ्यावी मशाल हाती, डोळ्यात तप्त वाती
दुष्कर्म भस्म होई, तेव्हाच शांत व्हावे

आता पुरे करावे, हे लाड भावनांचे
शब्दात मांडले ते, कर्तव्य आचरावे

उत्तुंग आसमंती, उत्स्फ़ूर्त घे भरारी
श्वासातल्या सुरांनी,अस्मान पांघरावे

डोळ्यात थांबवावे, आभाळ साचलेले
स्वानंद थेंब माझे, स्वच्छंद ओघळावे


वृत्त -- आनंदकंद

-- अभिजित गलगलीकर - २९-०५-२०१३

Monday, May 13, 2013

कामिनी वृत्त - एक प्रयत्न


आज नील आसमंत हो
चांदण्यात धुंद चंद्र हो

सूर लावला मनी तुझा
छंदमुक्त भावगीत हो

तेच स्वप्न काय शोधतो
या युगास उचित ध्येय हो

आज आसवांपल्याड जा
आणि कोवळा वसंत हो

एवढेच सांगतोय 'अभि'
वाचनीय चार शब्द हो ..

-- अभिजित गलगलीकर -- १३-०५-२०१३