Wednesday, January 8, 2014

द्वंद्व

द्वंद्व सुखाशी, उगाच नाही
दुःख उन्हाचे, नभात नाही

विसर पडावा, एवढी तरी,
तुझी नि माझी ओळख नाही

असे जर साथ निलकंठाची
समुद्रमंथन, असाध्य नाही

कितिक आळवू, मेघमल्हार...
नशीब माझे, बरसत नाही

येत जा अशी तू अधून मधून
तेवढाच मी, निःशब्द नाही

-- पादाकुलक वृत्त - (गझल )

अभिजित गलगलीकर
०७-०१-२०१४

Wednesday, January 1, 2014

तिचा अजुनही नकार आहे

तिचा अजुनही नकार आहे
अशी नशिबात बहार आहे

जरा अतर्क्य, निघावा अर्थ

असली कविता , तयार आहे

भेटता यावे तुजला म्हणून

शोधले नवे भुयार आहे

वेळीच तुला सावध करावे

यास्तव करतो प्रचार आहे

थकले जिणे टेकवायला

अंथरलेली पथार आहे

वास्तवास रे घाबरतो 'अभि'

सवे ठेवतो कट्यार आहे

वृत्त - पादाकुलक


-- अभिजित गलगलीकर - ०९-०८-२०१३

Thursday, August 15, 2013

मातृभूमी

मनी जपावी, मातृभूमी
आज स्फ़ुरावी, मातृभूमी.

गौरव शाली, मातृभूमी
कौतुक ल्याली, मातृभूमी

पुराणिकांची, मातृभूमी
नव गाण्यांची, मातृभूमी

अभिमानाची,मातृभूमी
त्या शहिदांची, मातृभूमी

स्वच्छ आरसा, मातृभूमी
जन्माचा वसा, मातृभूमी

जीवन अवघे, मातृभूमी
नमन तुला गे, मातृभूमी

(वृत्त - पादाकुलक)

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

-- अभिजित गलगलीकर - १५ - ०८- २०१३

Friday, August 9, 2013

स्वप्न मागे धावले

पावसाला आसवांनी आज पुन्हा गाठले
वाहणार्‍या भावनांचे, हुंदकेही दाटले

आसमंती ध्वस्त झाले पाखरांचे सोहळे
नेमबाजी साधणारे, हे पारधी नाचले

सोडुनी आराम आता, पांघरावी वादळे
वास्तवाचे सूर्य सारे, संधिकाली तापले

आरशाने पाहिलेला, चेहरा माझा नव्हे
घातकी त्या माणसाला, मी कधीचे सोडले

क्षीण नात्यांचे उसासे, बास झाले यापुढे
कर्मरेखा वाढताना, स्वप्न मागे धावले

वृत्त - कालगंगा

-- अभिजित गलगलीकर - १८-७-२०१३

Wednesday, July 10, 2013

कविता स्फ़ुरे किनार्‍याला

अशी झाली संध्याकाळ
ओलावले मन नभाचे 
निळ्या आकाशात भिनले
आरक्त श्वास क्षितिजाचे

परतण्यार्‍या पावलांना
साद थांबल्या स्वप्नांची
प्रत्येक वळणावर उभ्या
आतुरलेल्या नेत्रांची

ओझरती नजरभेट ही
ओसरलेल्या शब्दांची
या सैरभैर आकाशी
विखुरलेल्या भावनांची

संधिकालीच का यावे
उधाण शांत सागराला
लाटांना सावरताना
कविता स्फ़ुरे किनार्‍याला

- अभिजित गलगलीकर - २३-६-२०१३