Wednesday, August 27, 2008

सांजकविता - ५

तू भेटावे, बोलावे, ऐकवावे मनोगीत
स्फ़ुंदत पापण्यांतून वाहे खोटेसे स्मित

आत दडलेल्या आठवणी का बोलल्या
अगतिक मनाला का बरे त्या हसल्या

बरसलीस तू , शांत, मोकळी जाहलीस
माझ्या मनावर दवबिंदू होऊन साठलीस

संधिकाली, शांत वेळी, उलगडे तव मन
जागे माझ्या हृदयात अनोळखी स्पंदन

Tuesday, August 19, 2008

सांजकविता - ४

आठवणींचा समुद्र
मन तरंगती होडी
हेलकावे आसवांचे
हुंदका काढतो खोडी

एक किनारा भक्कम
परतवी हल्ले सगळे
दुसरा कोवळा जरा
साहतो क्षण सोवळे

या अनामिक संध्येला
आकाश भेगाळलंय
आठवणींना सांधत
सबंध मावळलंय

तुझी जमीन पर्वणी
साकळलेल्या मनाला
तुज भेटून उरेल
आयुष्य आचमनाला

Monday, August 18, 2008

सतेज तारा

देवाचं देवपण
नांदतंय आकाशात
साजरं माणूसपण
अनोळखी नकाशात

गवसला वाटसरू
सालंकृत रस्त्यावर
चोरून नेलं देवानं
स्वतःच्या खांद्यावर

कुठे गेला ,काय झालं
सवाल सर्वां पडला
सतेज तारा तो,हळूच
ढगाच्या आत दडला


माझ्या मामांना आज जाऊन ३ दिवस झाले .. त्यांना ही कविता भावार्पण ..

Sunday, August 3, 2008

मैत्रीचे आनंदकाव्य

आसमंतीचे अणू रेणू
गुणगुणती मैत्र अपुले
असेच सुस्वर निनादावे
जे नाते प्राणांपार जपले

कुठे कशी मैत्री जमली
खरंच मला नाही कळले
सहज सोबत वाहताना
दोन मनांचे झरे जुळले

सगळी आगळी गुपितं
एकमेकांना सांगितली
सुख दुःखाची चढाओढ
दोघांनी सोबत बघितली

काय लिहावे, काय नको
अनंत शब्द बघ सुचले
तू ना मी , या मैत्रीनेच
आनंदकाव्य बघ रचले