Sunday, May 20, 2007

हैदराबाद बॉम्बहल्ला .. एक विचार..

दिनांक १८ मे २००७, स्थळ हैदराबाद ,दुपारी २ च्या सुमारास मशिदीत जमलेल्या भाविकांवर भ्याड बॉम्बहल्ला झाला..
अतिरेक्यांच्या अंध, तत्वहीन हेतुंच्या पाठपुराव्यासाठी आणिक काही निरपराध सोंगट्यांसारखे उडवले गेले... खरंच माणसाला माणसाची किंमत उरलेली नाही... स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी या सुंदर जगाचा ध्वंस करण्याचा हक्क कुणी दिला यांना.. अशाच एका खेळणं बनलेल्या मनुष्याचा आत्मा हे भेसुर द्रुश्य बघुन सगळ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय...

लख्ख, सुंदर दिवस होता
अचानक रात्र झाली
प्रार्थना तर केली देवाची
सैतानाची हाक आली

मी कधी केले
कुणाचे टीचभर नुकसान
माझ्याच का नशिबी
विनाशाची वाट आली

स्वप्नांचे काय होणार
घराचे हाल कोण सोसणार
एका क्षणात भविष्य चिरडत
ती भेसुर घडी आली

धर्माचे गुणगान फ़क्त
अंध अतिरेकीच ते भक्त
मनुष्यधर्माची जाण कधी
कुणा का न आली

राजकारणाचे युद्ध सारे
कुणी तरी हारणारच
पण न खेळणाऱ्यांच्या माथी
कशी काय शिक्षा आली

पेटवा माणुसकीची होळी
पडू द्यात आहुत्या
स्वतःवर वेळ आल्याशिवाय
तुम्हास माणसाची किंमत न आली

काय मिळवाल तुम्ही
शाप सोडुन काही मिळणार नाही
काय जिंकाल तुम्ही
पायाखाली प्रजाही उरणार नाही
विनाशाचा मार्ग आहे हा
स्वतःहुन तो पत्करु नका
निरपराधावर लादु नका
अतिरेकी धुंदीत कळणार नाही
मृत्युची पावलं कधी धावत आली...

Wednesday, May 16, 2007

वावटळ- गझल (एक प्रयत्न)

उकरलेलं मन तो सारवत होता
निश्चल स्वप्नांना परत चालवत होता

कुणी ध्वस्त केलं सुंदर ते जग
विखुरलेल्या आठवणी तो आवरत होता

चेहऱ्यावरचं हसु पळवलं कुणीतरी
नेमकं उलट्या दिशेने तो धावत होता

आकाशालाही वाटला का त्याचा हेवा
मनाचं गळकं छप्पर तो बुजवत होता

झगमगाटात दिपले होते त्याचे डॊळे
शेवटचा दिवा तो आता मालवत होता

मंद वावटळीत भरकटले होते शब्द
जुनी ओळख म्हणुन त्याना बोलवत होता