Wednesday, January 25, 2012

जाऊं कहां बता ए दिल - रसग्रहण

तुम्हाला कधी असं जाणवलंय का, मनाला कोळिष्टकं लागली आहेत. त्या गुंत्यात जीव अडकून पडतो आणि हा पसारा आवरताना जळमटं प्रत्येक विचारांना चिकटतात.

अस्संच जाणवलं हे गाणं ऐकताना,
जाऊं कहां बता ए दिल, दुनिया बड़ी है संगदिल
चांदनी आई घर जलाने, सुझे ना कोई मंजिल...

शैलेंद्र यांचे शब्द, शंकर-जयकिशन यांचं संगीत.. चित्रपट छोटी बहन.


अतिशय उत्कट शब्दात हा गुंता कवीनी मांडलाय. कुठेही जाऊन उत्तर शोधलं तरी कधी कधी प्रश्नांचेच पुतळे उभे राहतात. त्यांचे जाळे गुरफटून टाकतात. कुणाचा आधार मिळेल असं वाटतं तर उलट त्या तेजानी डोळे दिपतात आणि काळोख आणखी गडद होतो..

बनके टूटे यहां आरजू के महल
ये जमीं आसमाँ भी गये हैं बदल
कहती हैं जिंदगी, इस जहाँ से निकल.... जाऊं कहां ..

कोणत्याही नात्याला काय लागतं तर , प्रेमाचा पाया आणि प्रेमाचीच उब.. भावनांची पाखरण आणि विश्वासाचं संरक्षण. हे आधारस्तंभ आणि मायेचं आभाळ रुसलं तर सगळंच कोसळतं. अगतिक मन त्या आभाळाकडे पाहत राहतं.. कुणी तरी येईल, मला सोबत नेईल. कुणिच नाही आलं तर देव तरी.
आसवांनी कितीही डोळे ताणून पाहिलं तरी ते क्षितिज शेवटी दूरच.