Friday, September 28, 2007

अभ्याचे अभंग...

आपणा सर्व मान्यवरा़स
देतो शब्द-मौक्तिक घास
चुकता काही.या पामरास
क्षमा करावी

मी नाही कुणी तपस्वी
नाही मी कुणी मनस्वी
पण तरिही थोडं शैशवी
बोलुन घेतो

मज भेटता छान हसती
पाठ फ़िरता मज कोसती
स्वतःशीच इमानी नसती
काही लोक

काहीना फ़क्त पैसाच सख्खा
हावलोभाचा दास तो पक्का
प्रेमावरही हिशोबाचा बुक्का
सांडला असे

म्हणती आज उपवास
साजुक खिचडीचेच घास
दोन कवळ मात्र भुकेल्यास
कोण देई

सगळेच तसे थोडे स्वार्थी
नसावे दुष्कर्माचे सारथी
जीवनाभ्यासाचे विद्यार्थी
आपण निरंतर

दडलाय अहं मनात
अवघड अशा कोनात
आणणे त्यास न्यूनात
सोपे नाही

बाणवा अंगी अभिमान
मनी प्रभुचे अधिष्ठान
ठेवा परोपकाराची जाण
इतुकेच पुरे...

Wednesday, September 26, 2007

ती जाताना ...

ती जाताना अवघं आयुष्य विरघळत गेलं
एकटं परतताना मनातनं ते ठिबकत गेलं

नजर मनाची वाटेवरून तुझ्या मुळी हटेना
ओझरत्या तुला ते डोळ्यात पुर्ण लपवत गेलं

काही क्षणांचा नव्हे,आता कायमचा विरह तो
शेवटचं स्माईल ओठांवर कसनुसं तरळत गेलं

जग हे जणू रंगमंच,इथे कधिही खेळ बदलतो
नवं हे कथानक मला फ़क्त प्रेक्षक ठरवत गेलं

अंतिम इच्छा वडिलांची,रुप अजब काळाचं
नको ते वचन, का तुझ्याकडून वदवत गेलं?

नको मागे वळुस सखे, मार्ग अपुला वेगळा
काय करशील जर,
गाठ सोडवताना मन गुंत्यात अडकत गेलं?

Monday, September 17, 2007

गणपती बाप्पा मोरया..

त्रिवार वंदन या श्री गणेशास करतो
निर्मळ, निरागसतेचे वरदान मी मागतो

प्रत्येक शुभारंभी असे विनायकाचे नाम
आशिर्वादे त्याच्या , पूर्ण होई इष्ट काम
नसेल निष्काम , सत्हृदय भक्ती मी करतो..
...त्रिवार वंदन या श्री गणेशास करतो

देव आहे,नाही , वाद थोडा ठेवा बाजूला
निमित्ये या, अहंकार तुझा बघ खिजला
आनंदात या, शरण मी त्यास जातो
...त्रिवार वंदन या श्री गणेशास करतो

मुक्त हसा , खेळा, बागडा या उत्सवात
लीनही व्हा चरणी, दंग नको फक्त नाचात
कृपेने त्याच्या, दहा दिवस स्वर्ग लाभतो
त्या श्री गणेशास त्रिवार वंदन मी करतो
निर्मळ, निरागसतेचे वरदान मी मागतो...