Monday, April 30, 2007

देवा, घे एकदा अवतार!!

देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
इथे मनुष्याचे राज्य
मंदिरही त्याचीच एक रचना

फ़क्त पाप धुवायचे काम देवाकडे
लडिवाळ ते अभिषेकादी साकडे
परत निघतसे नवीन पाप कर्मण्या
संपता पुण्याचे इंधन, येई मग हवना

दानपेटीस मिळते लाच दहा रुपयांची
बाहेर उभ्या देवाची सोय नाही खायची
रोज भजन असे भिकाऱ्याच्या श्रवणा
एवढे पुण्य असुन का ती वंचना

नुसतीच गीता वाचून कसा मिळनार स्वर्ग
चाललात का कधी परोपकाराचा मार्ग
तहानलेल्याची भागवलीत का कधी तृष्णा
ढोंगी उपासाच्या कसल्या हो वल्गना

देवळात असे भक्तांची वर्गवारी
भक्त तोच महान ज्याचा खिसा भारी
मोठी मजेशीर असे ही संरचना
दुकानदार पुजारी,भक्तीचा भाव उणा

म्हणुन देवा, घे एकदा अवतार
थांबव ही भक्तिची उसनवार
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
माणुसकी जागव रे प्रत्येक मना

Sunday, April 15, 2007

सखे, तुझ्यासाठी

बोलशील ना मज संगे, सखे तू
ऎकवशील ना ह्रुदयगीत मज एक दिन तू

आजकाल फ़ितुर झाली स्वप्नही तुला
राहशील ना त्या स्वप्नमहाली एक दिन तू

जपेन तुझ्या आसवांना मोत्यांसारखे
त्या शिंपल्याचा अवसर मज देशील ना तू

थांबवेन या काळाच्या प्रवाहाला
या अनोख्या संगमास देशील ना प्रत्यक्ष रुप तू

काळोख्या रात्री मी चंद्र पेटवत आहे
चांदणी बनून करशील ना मज सोबत तू

उधळेन आनंदाचे रंग सगळीकडे
त्या होळीचे निमित्त बनशील ना तू

बस,या फ़कीर मनाच्या खुप इच्छा नाही
फ़क्त चिरकाल साथ देणारी आठवण बनशील ना तू

Sunday, April 1, 2007

मनाचे उपद्व्याप..

हातात तुझा हात असावा, नयनी सदा तुच असावी
मनाला तुझ्यावाचून चैन पडेना, त्याल सवे सदा तुच हवी

मन धावतं क्षितिजाकडे, नजर त्याची रोखलेली
हाती काही लागेना,त्याला मात्र हीच वेडी आशा हवी

मन कधी ढग बनुन फ़िरतं, तुला शोधत सगळीकडे
चंचल हवेला चुकवत, कारण फ़क्त तुच भिजायला हवी

मन कधी थांबतं, निपचित पडुन राहतं
फ़िरुन थकलेलं, त्याला तुझी एक झुळूक हवी

दिवसभर आठवणींच्या झळा, मग येते गार कातरवेळ
असेनात असंख्य,पण चांदण्यांपैकी त्याला फ़क्त तुच हवी

मन घेतं रुप मग शिंपल्याचं, घेतं सागरात उडी
एकच आशा,किनाऱ्याच्या रुपात तिथे तु असावी

निघतं उत्साहात प्रवासाला, आठवणींची शिदोरी घेउन
कुठे ते ना ठावे, त्याला फ़क्त तुझी सोबत हवी

मन रमतं शब्दांच्या सहवासात, भान हरवतं
तिथेही त्याला अक्षररुपात तुच रेखाटलेली हवी..

Sunday, March 25, 2007

आपला चषक हरवलाय

विश्वचषक तो जिंकण्या निघाले अमुचे शूरवीर
द्रविड तो अग्रस्थानी, सरसावूनी आपुले कमान-तीर

सोबत होत्या शुभेच्छा, होते अपेक्षांचे ओझेही
ज्योतिष्यही पाठिशी, आले यज्ञकर्ते साधूही

अवघ्या देशाचे पाठबळ, आशिर्वादाची भली मोठी शिदोरी
अनुभवही कमी नसे, जगज्जेत्यांनी भरली पोतडी

कॅरिबियनला पोचताच सगळे अस्त्र शस्त्र परजले
विंडिजला धूळ चारली, हॉलंडपुढेही आवेशात गरजले

वाटले, अहा, काय जंगी सुरुवात झाली
कप नाही, पण सेमी फ़ायनल तर नक्कीच आपली झाली

पण, पण नशिबाने ऎन वेळी इंगा दाखवला
नशिब म्हणता की डेव्हिडने मदमस्त गोलियाथ हादरवला?

उमटले पडसाद, त्या यःकश्चित ढोनीच्या घरापुढे
तरीही धीर मंडळीस, खेळतील नक्कीच यापुढे

मागल्या वेळेसही होती अशीच डळमळीत सुरुवात
पण झुंजार दादांनी मारले फ़ाइनलपर्यंत हात

बर्म्युडाविरुद्ध फ़ुकलेले रणशिंग ऎकुन सर्व सुखावले
पण हाय, श्रीलंकेपुढे कागदी धुरंधर पत्त्यांप्रमाणे कोसळले

अब्ज जनता दिःड्मुढ झाली,त्यांचे देव हरले
दोघांनी सोडले प्राण, उरलेले जखमा कुरवाळीत बसले
(आजच टाइम्स मधे न्यूज वाचली)

दोष कुणाकुणाला द्यावा,स्वतःच म्हणती आम्ही त्या लायक नाही
कॅचेस सोडुन हसता लेकहो, तुम्हाहून कुणी नालायक नाही
(बांगलादेश विरुद्ध ढोनीने मुनाफ़च्या बोलिंगवर कॅच सोडली तो क्षण. त्या बॅट्समनने मग पुर्ण मॅच काढली..)

ब्रॅंड ऍंबेसेडर म्हणुन दिवसरात्र झळकत राहणार
पैसा धुळीसारखा उडतो, मैदानावर पायधूळ उगाच कोण झाडणार

परत नवी सुरुवात करण्याची हीच वेळ आहे
भ्रष्ट नीती डावलून पारदर्शकतेची आली वेळ आहे
राखेतून फिनिक्सचा जन्म होण्याची आता गरज आहे
दुर्दम्य इच्छा, निष्ठा अंगी बाणवण्याची गरज आहे

वाटत असेल, मीच का बरळतोय, सगळ्याच्या ह्याच भावना हो..
स्वप्न सुरु होताच भंगले, अवघा देश जागा झालाय
काय करावं, शेवटी आपला चषक हरवलाय, आपला चषक हरवलाय...

Friday, March 23, 2007

स्वप्न

काल समोरच्या वळणावर तू दिसलीस, खुप दिवसानंतर
हर्षले मन, धावत सुटलो मी, त्या आठवणीनंतर

गाठले तुला, हाय, पण ती तू नव्हतीस
परत सगळं जुळवत बसलो,तुटलेल्या स्वप्नानंतर

असं रोजच का होतं, मला उमजत नाही
रोज वाटतं, तू भेटशील त्या वळणानंतर

आठवणींचा पसारा खुप मोठा,आवरणे मला शक्य नाही
नव्या पण कशा येणार, त्याना जागा जुन्या विसरल्यानंतर

माझी अवस्था नदीसारखी, तीसुद्धा धावत असते सागरामागे
तिलाही कल्पना नसते, तो उभा अनंत वळणानंतर

का मी चातकासारखा?, त्यालाही वाट पावसाची
पाउसही तसाच, तोही येतो जमीन होरपळल्यानंतर

नाही म्हणता मी एक भक्तच, पण माझा देव रुसलाय
निरागस मनाची प्रार्थना, ती फ़ळेल फ़क्त भेटीनंतर

बघा माझेही किती सोबती आहेत
भंगलेलं स्वप्न जुळवण्यात सगळे रमले आहेत
स्वप्न खरं होण्याचं स्वप्न आजकाल माझ्या पापण्यात असतं
काय सांगावं, ते प्रत्यक्षात अवतरेलही, डोळे उघडल्यानंतर