Friday, August 9, 2013

स्वप्न मागे धावले

पावसाला आसवांनी आज पुन्हा गाठले
वाहणार्‍या भावनांचे, हुंदकेही दाटले

आसमंती ध्वस्त झाले पाखरांचे सोहळे
नेमबाजी साधणारे, हे पारधी नाचले

सोडुनी आराम आता, पांघरावी वादळे
वास्तवाचे सूर्य सारे, संधिकाली तापले

आरशाने पाहिलेला, चेहरा माझा नव्हे
घातकी त्या माणसाला, मी कधीचे सोडले

क्षीण नात्यांचे उसासे, बास झाले यापुढे
कर्मरेखा वाढताना, स्वप्न मागे धावले

वृत्त - कालगंगा

-- अभिजित गलगलीकर - १८-७-२०१३

No comments: