Monday, September 6, 2010

गोड उमाळे

आनंदाचे सोहळे,नाजूक कोवळे
गहिवरल्या मनाचे गोड उमाळे

स्वागताला घरदार नटले साजरे
या अंगणी उमटतेय नाते गोजिरे
बहरत्या झाडाला कुंकवाचे आळे..
..गहिवरल्या मनाचे गोड उमाळे..

किती आतुर,किती अधिर गेले दिवस
थोडे तुरट, थोडे मधुर गेले दिवस
घेई नव्या पारंब्यांवर स्वैर हिंदोळे..
..गहिवरल्या मनाचे गोड उमाळे..


रेशमी धाग्यांचे मखमली बंधन
पुलकित मनात संस्कारांचे स्पंदन
अलगद रेखलेले स्वप्नांचे जाळे..
..गहिवरल्या मनाचे गोड उमाळे..


-- अभिजित -- ०६-०९-१०