Wednesday, April 30, 2008

एक सवय लागलीय मला..

एक सवय लागलीय मला..
तुझ्या असण्याची , तरी नसण्याची
तुझ्या बोलण्याची , तुझ्या हसण्याची
एक सवय लागलीय मला...

लिहायचं म्हणून लिहत नाहीये
रुपकं उगाचच चुरगाळत नाहीये
तुला परत परत आठवायची
नकळत त्या ओघात लिहण्याची
एक सवय लागलीय मला...

माहित्ये तू मला वेडा म्हणशील
खुळा नाद चला सोडा म्हणशील
पण ह्या अनामिक नादिष्टपणाची
त्या जादूई स्वरांमधे वाहण्याची
एक सवय लागलीय मला...

असेल कितीक मधे तो दुरावा
हाच उलट सांधणारा एक दुवा
असेच हवे तसे अर्थ काढण्याची
कळूनही सगळे, न उमजण्याची
एक सवय लागलीय मला...

Monday, April 28, 2008

सफ़र ..

इन सुनसान गलियों मे न जाने क्या अपनासा है
शायद इन मे छुपा कोई धुंधला एक सपनासा है

सांवलीसी मुरत कॊई,आस पास कही
सायें सी लिपटी,सीने के आस पास कही
ये ख्वाब इस शाम मे भी,एक आहना सा है
(आहना -> सुरज की पहली किरणें)

एक वो रंगीन तितली कही उडती दिख गई
छुईमुई यादें , छन से हसकर झलक गई
ये सन्नाटा भी अब लगे, एक हसीं तरानासा है

हर वक्त क्यू उनकी याद गुनगुनाती रहती है
अभी से फ़िर मिलनेकी झंकार सुनाती रहती है
बडा बेसब्र ये सफ़र भी,बेगाना,इक दिवानासा है

Friday, April 25, 2008

अजुन काय व्याकरण मागू..

समईभर घर
मायेचं साजूक तेल
उत्फ़ुल्ल मनांच्या वाती
अजुन किती प्रकाश मागू...

अनमोल तिचे बोल
काळापार तो काळ
नादमयी तिचा श्वास
अजून कुठलं गाणं मागू...

चार वाक्यांची कविता
प्रोत्साहनाचे अलंकार
कौतुकाची रुपकं
शिकवणुकीची यमकं
खट्याळवृत्ती उत्तरं
अन ह्या निर्मळ प्रेमामुळे
शोभणारी शब्दलक्तरं
अजुन काय व्याकरण मागू...

-- अभिजित -- २५ - ४ - ०८

Monday, April 21, 2008

थोडी तुलाही, थोडी मलाही

आठवणींची ओलेती सय
थोडी तुलाही, थोडी मलाही
अलवार स्वप्नांची सवय
थोडी तुलाही, थोडी मलाही

कालच्या बोलण्याची आच, ओली अजून
पुढच्या फ़ोनची साद , कोवळी अजून
ऎकवून जाते, स्मितभर
थोडी तुलाही, थोडी मलाही

मनाच्या गुदगुल्या क्षणभर सुखवती
उगा बेचैन होऊन, स्वप्नं जागवती
छळती नुसतं रात्रभर
थोडं तुलाही, थोडं मलाही

सगळीकडे कुजबुज आपल्या दोघांची
आता वाट मुक्त भिजवणाऱ्या मेघांची
परत भेटीची आतुरता
थोडी तुलाही, थोडी मलाही .. ..

-- अभिजित ... २१-४-२००८

Tuesday, April 15, 2008

शब्दथेंब..

दोन चार शब्दथेंब
थोडे ओले थोडे उबदार
थोडे कोवळे थोडे कसदार
थोडे गोड थोडेस्से आंबट
थोडे रावजी थोडे बहंभट
थोडे निळे थोडे हिरवे
थोडे गरूड थोडे पारवे
थोडे लहरी थोडे छंदी
थोडे वृत्तीय थोडे स्वच्छंदी
असे तसे ,कसेही असोत
भिजवतील तुम्हांस चिंब चिंब
चेहऱ्यावर उगवेल
सोनेरी चंदेरी अलवार स्मितबिंब
.. ..