स्वप्नांशी बोलणारी तू..
स्वप्नांत बावरणारी तू
स्वप्नं माळणारी तू
स्वप्नं सावरणारी तू
स्वप्नं पालवणारी तू
स्वप्नं भासवणारी तू
स्वप्नं जागवणारी तू
स्वप्नं आवरणारीही तू
स्वप्नं जुळवणारा मी
स्वप्नं सांधणारा मी
स्वप्नापार गेलो की
स्वप्नं तोडणारा मी
#2
स्वप्नांच्या पारंब्या
खुप ताणू नयेत
झोका घ्यावा पण
हात सोडू नयेत
दिलाच तर द्यावा
आधार मनापासून
ओठातून नको, दे
श्वासांच्या मुळापासून
उंच उडत गेल्यावर
दम लागायला नको
हसत सुरु जो प्रवास
स्मित थकायला नको
स्वप्नांची परिक्षा दे
पेपर पूर्ण सोडवायला
तयारीच नसेल त्याची
शून्य नको मिरवायला
#3
मनाच्या आकाशी
स्वप्नांचं चांदणं
एखादीच अवस
परत अथांग
निळसर नांदणं..
उगवेल अजुनी
नवा एक तारा
मोहवेल तुज
हसशील तू ही
काढून टाकशील
पापणीतला हा
बेचव कचरा ..
#4
रात्र आली , रात्र गेली
स्वप्नं मात्र खोळंबली
ह्या कप्प्यात, त्या कोपर्यात
मनाच्या भन्नाट पसार्यात
सगळीकडे जाऊन दडली
अन माझीच खोडी काढली..
हाकलून दिलं सगळ्यांना
तरी परत आली ...
आता मात्र कोंडून टाकली..
बंद बंद .. बस्स..
आज ती खोली उघडली
डोळे विस्फ़ारून बघत
परत येऊन बिलगली ..
स्वप्नंच होती .. बहुतेक ...
No comments:
Post a Comment