Wednesday, April 2, 2008

फ़ाटकी झोळी ..

स्वप्नांचं गाठोडं मनात काय घेउन बसलात
फ़ाटक्या झोळीत सोनं काय घेउन बसलात

आशेच्या लांब पारंब्या स्वप्नांच्या झाडाला
अनंत तृष्णेचा शाप ह्या गोजिऱ्या वडाला
अधांतरी झोक्यांचा छंद काय घेउन बसलात
फ़ाटक्या झोळीत..

मनाच्या लाटांचं प्रतिबिंब पूर्ण आरसाभर
स्वप्नांची वाळू उरते किनाऱ्यावर पसाभर
सोडून जाण्याऱ्या हातांचं काय घेउन बसलात
फ़ाटक्या झोळीत..

हरवल्या क्षणाचा लोभ मोठा ह्या जीवाला
हरवतो परत परत मुद्दाम त्या क्षणाला
जुन्याच घरात काय असे दडुन बसलात
फ़ाटक्या झोळीत..

-- अभिजित गलगलीकर ..

-- २--४-२००८

1 comment:

मोरपीस said...

पोस्ट फ़ारच छान आहे.