Sunday, September 28, 2008

विचित्र कविता - ४

हातातून सटकलं काहीतरी
मी वेगात गाडीवर ..
तिच्या विचारांच्या ओघात ...

खण्णकन आवाज आला
कळलंच नाही काय झालं
काच तुटून पडली होती ..
विखरल्या गेली होती ..

आरश्याकडॆ पाहिलं मी
पण तो तर जागेवरच ..
काय पडलं मग ते ...
बहुतेक बहुतेक ..
मनातलं स्वप्नं निखळलं होतं..
नकळत अलगद ..
उचकटल्या गेलं होतं ..
मारली तरी पुढली मजल ..
दिलं ते तसंच सोडून ..

परत येताना थांबलो ..
तुकड्यांमधे नशिब शोधत..
ते स्वप्न परत जुळवत बसलो ..

Thursday, September 25, 2008

स्वप्न म्हणजे..

स्वप्न म्हणजे..
मुठीत धरलेले पाणी
नभांत उरलेली गाणी
कितीदा संपली तरी
नव्याने चालणारी कहाणी

स्वप्न म्हणजे..
धुकं ल्यायली चांदरात
अल्लड गवताची पात
मनाच्या देव्हाऱ्यामधे
सांजेला तेवणारी वात

स्वप्न म्हणजे..
आशेचं उंच अस्मान
कधी निराशेचं गर्द रान
वास्तवाला शह देऊन
अथांग हरपलेले भान

Tuesday, September 23, 2008

Resurrection

भान हरवून भावनांचा पाठलाग केला
शब्दात त्यांच्याशी जरा खेळू म्हणतो
आयुष्य सावरायचे प्रयत्न खूप झाले
आता पसाऱ्यातच जरा लोळू म्हणतो

खूप स्वप्नं होती, अगदी आकाशभर
पंखांना जरा आराम करू द्यावे म्हणतो
घट्ट धरली मूठ सोडून टाकली आज
नसत्या स्वप्नांना का अडवावे म्हणतो

रडत नाही, हसत लिहितोय रे सगळे
आसवांना मोठ्ठी सुट्टी द्यावी म्हणतो
तुमच्यासारखे मित्र लाभलेत ना मला
जगायची जुनी चव परत घ्यावी म्हणतो ..

Tuesday, September 16, 2008

तू म्हणजे ..

तू म्हणजे ..
स्वच्छंदी रान व्हावे
सत्याचे भान व्हावे
कधी संयमी, कधी
अवखळ सान व्हावे


तू म्हणजे ..
आयुष्याचा श्वास व्हावे
जगण्याची आस व्हावे
जगाशी लढायचा
आत्मविश्वास व्हावे


तू म्हणजे ..
मनाचा ध्यास व्हावे
विचारांचा प्रास व्हावे
प्रत्येक कवितेतला
जिवंत भास व्हावे

Saturday, September 13, 2008

विचित्र कविता - ३

स्वप्नं असतात सगळी ..
मनातली
प्रत्यक्षातली
अनुभवातली
अनवधानातली ...

सत्याचा एक चटका ..
अन मग उरतो ..
धगधगणारा भूतकाळ ...

त्याला शमवायला लागतो..
निर्मळसा
अढळसा
कोवळासा
सुंदर सावळासा ..
एक पाउस नवा ..
मृदू असा गारवा..

Monday, September 8, 2008

विचित्र कविता - २

आशेचा कहर
नैराश्याचा बहर
स्वप्नांचं जहर
कधी रे फ़िरेल
काळाची लहर

आठवणींची रास
खिदळणारे भास
सजतेय मनाची
उद्विग्न आरास

विचित्र भावना
विचित्र हे शब्द
कधी मावळतील
दिवस हे संदिग्ध

Sunday, September 7, 2008

सांजकविता - ६

सतत भास होतो
तू माझी असल्याचा
सुगंध दरवळतो
मनात वावरल्याचा

गूढ संधिप्रकाशात
विहरणारे विचार
तुला आठवून चाले
स्वप्नांचा स्वैराचार

शून्यात दृष्टी लावून
न्याहाळतो आकाश
तुझ्या चांदणीत गं
सामावतो सारांश

काय लिहू, काय सांगू
इतकेच म्हणतो .. 
प्रत्येक क्षणात तू
अविरत मनात तू
मुक्त आनंदात तू
चंद्रकलेसम बहरता
स्वप्नपारिजात तू

Tuesday, September 2, 2008

विचित्र कविता - १

आयुष्याचं गणित ..
सोप्पं सरळ वाटणारं ..
भर भर सुटतं ..
शेवटच्या पायरीपर्यंत..
कसं काय अचानक
धस्सकन ठेचकाळतं..
शेवटचं पाउल
जागीच साकळतं ..
तो पेपर तसाच राहतो ..
अपूर्ण, असंबद्ध ..
शेवटपर्यंत ...
..
कुणीतरी उत्तर सांगेपर्यंत ..