Friday, April 24, 2009

ये अशीच ये

ये अशीच ये
मनापासून ये
श्वासांसारखी
सहज परतून ये

हसलेत काही
रुसलेत काही
खोटं ठरवत
त्याना जळवून ये

किती वाट पाहिली
किती वाट साहिली
मृदु सोबतीची
झूळूक होऊन ये

माळून आठवणी
कोवळ्या या क्षणी
नवे स्वप्नशब्द
मला सुचवून ये



Saturday, April 11, 2009

तुझ्यातच सर्व अर्थ

गुंफ़लेल्या चार ओळी
अक्षर अक्षर जाळी

तू स्तब्ध,निशब्द
अवचित हे प्रारब्ध

स्वप्नवत, अर्धवट
मन गुंततं उर्मट

निस्वार्थ काही स्वार्थ
तुझ्यातच सर्व अर्थ

Thursday, April 9, 2009

स्वप्नांची रुपं

मन-चंद्राची प्रभा
आकाश व्यापते
स्वप्नांची आभा
क्षितीज लांघते

येते सागराच्या
आसवांना भरती
स्वप्नांच्या लाटा
आठवणी कोरती

स्वप्नं मनस्वी
स्वप्नं तेजस्वी
मन - अरण्यात
स्वप्नं तपस्वी

स्वप्नांची ही रूपं
किती वाखाणावी
कुणाचे स्वप्न होऊ
अशी स्वप्नं बघावी...

Saturday, April 4, 2009

स्वप्नराणी

रात्र अंगी लपेटून
ती प्रवासाला निघते
चांदण्यांना चुकवून
क्षितीजामधे दडते

मनातले दवबिंदू
मातीत रुजतात
तिच्या माझ्या गप्पा
थेंबांमधे मोजतात

अलगद रुसते
खुदकन हसते
स्वतःच्या खोड्यांमधे
स्वतःच फ़सते.. 

रोज तिला स्फ़ुरते
आगळी एक कहाणी
माझेच गीत रेखते
माझी ती स्वप्नराणी

मृत्यु

मृत्युची भीती
शाश्वत आहे
विचारांसारखी
अनि्श्चित नाही..

उगा फ़ुशारक्या
नको हिमतीच्या
जरी त्याचं येणं
सुनिश्चित नाही ..

जगण्याला मूल्य
त्याच्यामुळे आहे
कुणाचे अमरत्व
परिचित नाही ..

असावा आदर
आतंक नसावा
भविष्य कुणाचे
स्वरचित नाही ..