Tuesday, December 25, 2007

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु..

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु

वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु

तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु

अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु

इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु

आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु

अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु

सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु ...

--- अभिजित गलगलीकर ...

Sunday, December 23, 2007

एक सुंदरशी रुबाई...

कुणा कवीची आयुष्याची कमाई आहे
जणु ती एक सुंदरशी रुबाई आहे

ब्रम्हदेवही नक्कीच थक्क झाला असावा
प्रत्यक्ष जाहली, त्याने मारलेली बढाई आहे

कवितांची माझ्या , स्फ़ुर्ती तीच ती
शब्दांची माझ्या नकळत तीच आई आहे

दिवाण्या प्रेमास माझ्या तिने स्वीकारले
अख्खी हयात माझी तिची उतराई आहे

लिहतच रहावं, गौरवावं तिचं सौंदर्य
आयुष्य संपु नये मधे,म्हणुन ही घाई आहे ..

शाळेबाहेरची शाळा ...

शाळेत असताना मधल्या सुट्टिची मजा भारी
डब्बा खाऊन खेळत बसायची गम्मत न्यारी

काही मुलं पॉकेटमनीतुन विकत घ्यायची काहीसं
त्याना पाहून कधी माझंही तोंड व्ह्यायचं एवढुसं

लहान मुलांना पैसे न द्यायची शिस्त होती घरात
लाडाकोडाची मात्र असायची नित्य बरसात

पण वाटे आपणही कधी चटक मटक विकत घ्यावं
हातात आईस्क्रीम घेउन मित्रांसोबत मस्त मिरवावं

दिसले एकदा मित्राच्या बॅगेतले पैसे उघडे पडलेले
मधल्या सुट्टित माझ्याही हाती मग खाऊ आले

घराजवळ पोचताच लोक अचानक धावत निघालेले
पळणाऱ्या चोराला पकडुन शेवटी बेदम मारलेले

जाम टरकली माझी , खिशातले चॉकलेट बोचू लागले
सगळे लोकं परत वळुन मला मारणार जणु पटले

धुम ठोकली घराकडे , लगेच आईला बिलगलो
तिला सगळं खर्र सांगुन खुप खुप रडलो
वर्षभर शिकुनही मनाची पाटी कोरी राहून जाते
शाळेबाहेरची शाळा नकळत बरंच शिकवून जाते

Wednesday, December 12, 2007

लोकमत ...

रोजच्याच बातम्या ऎकुन मन निर्ढावलंय
आश्वासनं पुर्ण होण्याचं स्वप्न कधीच मेलंय

मरोत बापडे शेतकरी, वा तत्सम प्राणी
पैसे खायला इथे त्यांचं मढं कमी पडतंय

नातलगांची चित्रे आता संसदेत पोहोचली
खऱ्या स्वातंत्र्यवीरांना आता कोण पुसतंय

एकमेकांची कुमुळं काय उकरता नेहमी
एखादं गुणबीज तुम्ही कधी रुजवलंय?

स्वार्थी कोण नसतं असं ते म्हणती
आपण बांडगूळ की माणुस,कुणीतरी विसरतंय

लिहितोय मी एकटाच असे थोडीच आहे
पण लोकप्रतिनिधिना लोकमत कुठे हवंय

Monday, December 10, 2007

देखेंगे हम भी जरूर.......

नमस्कार ... आज खोया खोया चांद सिनेमा पाहुन येताना काही सुचले.. आपल्यासोबत शेअर करावेसे वाटले .. तरी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात .. ..

देखा है हमने भी
जिंदगी को इतराते हुए
खुशहाल वादियों मे
दिल को लहराते हुए.........

दिल की तो आदत सी है
ख्वाहिशें सजाने की
रोज बह जाते है पर
नये ख्वाब देखने की
देखा है हमने भी
आंसुओ को शरमाते हुए...........

यूं आसान नही है
गम से मुह मोड लेना
एकसी सजावट हर वक्त
चेहरे पे बनाये रखना
देखा है हमने भी
दिल को पुराने जख्म कुरेदते हुए........

हमे कोई शिकवा नही
ये जिंदगी तो खेल है
रोज नये नये सवाल
कभी पास, कही फ़ेल है
देखेंगे हम भी जरूर
तकदीर को मुस्कुराते हुए
फ़िरसे जिंदगी को इतराते हुए
खुशहाल वादियों मे
दिल को लहराते हुए.....

Saturday, November 24, 2007

हिंदी गीतांचे स्वैर अनुवाद ...

बोल ना हल्के हल्के (झूम बराबर झूम)

राहत फ़तेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेल्या या सुंदर गाण्याचा हा स्वैर अनुवाद ...

आणुया चांदण्यांकडुन प्रकाशाचे धागे
दडवू तुला त्या सुंदर पदरामागे
लाजऱ्या तुला घेईन हळूच मिठीत
श्वासात श्वास थोडा गूंफ़ू दे
बोल ना सखे तू, ओठातूनी स्वर वाहू दे

साखरझोपेत एक सौदा होऊ दे
एक स्वप्न घे , एक स्वप्न दे
स्वप्न ते एक आहे या नयनी
चंद्राची उशी लाभली त्या स्वप्नी
त्या आकाशालाही डोळे मिटू दे
बोल ना सखे तू, ओठातूनी स्वर वाहू दे

वर्षं लागली किती, ते बोलायला
दोन शब्द, एक गोष्ट सांगायला
एक एक दिवस तो शतकाएवढा
तर रात्र ती आयुष्याएवढी भासे
कसे शांत राहवले असेल त्याना
एक क्षण जेव्हा एक जन्म भासु दे
बोल ना सखे तू, ओठातूनी स्वर वाहू दे.. .


डोर मधील ’ये होंसला’ हे सुरेख गाणं ...

ही जिद्द कशी झुकणार
इच्छा ही कशी रोखणार

कठीण कितीही ध्येय असू दे
क्षितिज ते अजेय असू दे
मन हे एकलंच असू दे

ही जिद्द ....

मार्गावर असती काटे जरी
त्यावर चालायचेच आहे
संध्या लपवते हा सुर्य जरी
रातीला ढळायचेच आहे
दिवस बदलतील रे
हिम्मत जिंकविल रे
सकाळ ती येईल रे
ही जिद्द ....

असेल आम्हावर मर्जी त्याची
उन्हातही सावली लाभेल
एकच आशिर्वाद मला हवा की
लक्ष्य खुद्द मला गाठेल
प्रयत्न जरी शंभर रे
इच्छा तुझी अमर रे
प्रेमात नाही हार रे
ही जिद्द ....

( with help from Vrinda Kajarekar too.. )

Thursday, November 22, 2007

कवी - कवयित्रीचा मिळून स्वयंपाक ..

कविता माझी , अन कविता तिची
स्वयंपाकात यमकाची फ़ोडणी साची

लाटणे अलंकाराचे, वृत्ताचे पोळपाट
साजूक रुपकं ,भरल्या कवितेचं ताट

किचनमधे चालला गोंधळ दोघांचा भारी
यमकाचं निवडण, कधी मतल्याची तयारी

चेष्टा मस्करीचा नवा बाज असा
गालावर उमटलेला शब्द पिठाचा ठसा

भांडणातही पद्याची घेतात हो साथ
त्या वाक्यांतही शब्द जुळविती आठ
वांग्याचे तुझे हे भरीत
जसे लंगड्या शार्दुलाचे विक्रीडीत
तुझ्या भाज्याना तर काय द्यावी उक्ती
ही तर जशी कवितेत यमकांची अतिशयोक्ती

पण जमतो शेवटी फ़र्मास बेत
जेवू मग एकमेकाना दाद देत
प्रास , यमकाचा रेडी दाणेकूट
मस्त जमतं बघा मग मेतकूट .. ...

Thursday, November 15, 2007

मला हसवणाऱ्याची वाट पाहतोय..

जगणं चाललंय , हसत खेळत
रोज नवीन मुखवटा घालतोय
हसवतोय सगळयाना दिलखुलास
मला हसवणाऱ्याची वाट पाहतोय

हरेक वळणावर थांबलो , अडलेली मदत करायला
कुणी तर नेलं मज त्यांच्या स्वप्नात फ़िरायला
आता या शहराच्या गल्ल्यांमधे मात्र एकटाच भटकतोय
अन मला हसवणाऱ्याची वाट पाहतोय..

आज मी कुणाचा , परवा तिसऱ्याचा
करमणुक एकच उपयोग मा बिचाऱयाचा
निस्वार्थ बिस्वार्थ सब झूठ
माझ्या प्रेमाच्या बदल्यात थोडं प्रेम मागतोय
अन मला हसवणाऱ्याची वाट पाहतोय..

भलतेच गंभीर वाक्यं ऎकून मंडळी बेफ़ाम
चिंटुमुखातून कसे ओघळले सूर हे बदनाम
वा वा म्हणुन सोडुन द्याल
खरं मनातलं सालं मीही उगाच लिहितोय
ठरवलंय , अजून हसवेन सगळ्याना
आत्ताच त्या हास्याची मुक्त साद ऎकतोय .. [:)] ..

Monday, November 5, 2007

मन वेडं ......

आज सारखं राहून राहून वाटतंय
मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

खिडकीत आलं एक अवखळ पान
कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान
अनामिक त्या सुगंधाच्या भासाने
सारं अंग अंग शहारतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

एक मैत्रीण त्यास हवी
चिडवून भांडायला
रुसवून मनवायला
सदोदित सोबतीला
त्या धुंद चांदरातीला
स्वप्न हे पूर्ण होण्याचं
स्वप्न मनी बाळगतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

म्हणुन आज सखी तू ये ना
मनाला खुदकन हसू दे ना
स्वप्नातही तव रूप पाहून
मध्यरात्री ते उनाडतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

Friday, October 19, 2007

एक कविता ...

भले आलो होतो मैत्री मिरवायला
ती फ़क्त ओळख दाखवून गेली
हृदयि ठेविले तिला रात्रंदिवस होते
कधी संधिकाली फ़क्त दोन क्षण भॆटून गेली

कितिदा बोलायचा प्रयत्न केला मी
एखाद्या वेळी चूकून ती हसून गेली
आस असे फ़क्त एका त्या नजरेची
कितिदा स्वप्नं नजरेत दडवून गेली

शेवटी मी पक्का निर्धारच केला
अन प्रयत्नांचा कहरच हो केला
शब्दबागेत यायला तिला मनविले
कधी नव्हे तर ती हो म्हणुन गेली
तिथेही गोंधळ झाला अन ती हरवली
खुप शोधले शब्द - गराड्यात
अन, अन, शेवटी कुठे ही एक कविता सुचून गेली... :)

Friday, September 28, 2007

अभ्याचे अभंग...

आपणा सर्व मान्यवरा़स
देतो शब्द-मौक्तिक घास
चुकता काही.या पामरास
क्षमा करावी

मी नाही कुणी तपस्वी
नाही मी कुणी मनस्वी
पण तरिही थोडं शैशवी
बोलुन घेतो

मज भेटता छान हसती
पाठ फ़िरता मज कोसती
स्वतःशीच इमानी नसती
काही लोक

काहीना फ़क्त पैसाच सख्खा
हावलोभाचा दास तो पक्का
प्रेमावरही हिशोबाचा बुक्का
सांडला असे

म्हणती आज उपवास
साजुक खिचडीचेच घास
दोन कवळ मात्र भुकेल्यास
कोण देई

सगळेच तसे थोडे स्वार्थी
नसावे दुष्कर्माचे सारथी
जीवनाभ्यासाचे विद्यार्थी
आपण निरंतर

दडलाय अहं मनात
अवघड अशा कोनात
आणणे त्यास न्यूनात
सोपे नाही

बाणवा अंगी अभिमान
मनी प्रभुचे अधिष्ठान
ठेवा परोपकाराची जाण
इतुकेच पुरे...

Wednesday, September 26, 2007

ती जाताना ...

ती जाताना अवघं आयुष्य विरघळत गेलं
एकटं परतताना मनातनं ते ठिबकत गेलं

नजर मनाची वाटेवरून तुझ्या मुळी हटेना
ओझरत्या तुला ते डोळ्यात पुर्ण लपवत गेलं

काही क्षणांचा नव्हे,आता कायमचा विरह तो
शेवटचं स्माईल ओठांवर कसनुसं तरळत गेलं

जग हे जणू रंगमंच,इथे कधिही खेळ बदलतो
नवं हे कथानक मला फ़क्त प्रेक्षक ठरवत गेलं

अंतिम इच्छा वडिलांची,रुप अजब काळाचं
नको ते वचन, का तुझ्याकडून वदवत गेलं?

नको मागे वळुस सखे, मार्ग अपुला वेगळा
काय करशील जर,
गाठ सोडवताना मन गुंत्यात अडकत गेलं?

Monday, September 17, 2007

गणपती बाप्पा मोरया..

त्रिवार वंदन या श्री गणेशास करतो
निर्मळ, निरागसतेचे वरदान मी मागतो

प्रत्येक शुभारंभी असे विनायकाचे नाम
आशिर्वादे त्याच्या , पूर्ण होई इष्ट काम
नसेल निष्काम , सत्हृदय भक्ती मी करतो..
...त्रिवार वंदन या श्री गणेशास करतो

देव आहे,नाही , वाद थोडा ठेवा बाजूला
निमित्ये या, अहंकार तुझा बघ खिजला
आनंदात या, शरण मी त्यास जातो
...त्रिवार वंदन या श्री गणेशास करतो

मुक्त हसा , खेळा, बागडा या उत्सवात
लीनही व्हा चरणी, दंग नको फक्त नाचात
कृपेने त्याच्या, दहा दिवस स्वर्ग लाभतो
त्या श्री गणेशास त्रिवार वंदन मी करतो
निर्मळ, निरागसतेचे वरदान मी मागतो...

Tuesday, August 28, 2007

ओवाळणी सांग काय घालु तुला..

सोनियाचा दिवस हा . निर्मळ नात्याचा सोहळा
शब्दातून काय वर्णावे , सुंदर क्षण हा आगळा

रेशमी नाजूक बंधन , निस्वार्थ मायेची ही गुंफ़ण
बंधनातही आनंद या, धाग्याचा या रंगच वेगळा
शब्दातून...

वर्षभर भांडण जरी, दडलंय मनी प्रेम तरी
अबोल स्नेहाला बोलका, करतो सण हा खुळा
शब्दातून...

एक मैत्रिण ती, कधी तर छोटीशी आई पण असते
न्यारंच हे नातं , खरंच ,अनमोल असे ते सकळा
शब्दातून...

आजन्म पाठिशी राहीन, गरज नव्हे बोलण्याची
जन्मच तोकडा जिथे, ओवाळणी सांग काय घालु तुला
शब्दातून...

Sunday, August 26, 2007

पहिलं प्रेम....

धुंद पाऊस पाहायला खिडकीत आलो
अन् मनातल्या मनात चिंब भिजलो

न जाणे कुठून एक सुगंधी आठवण स्मरली
मुग्ध कविता होऊन ती समोर अवतरली

कांती तिची तेजस, वाणी ती मधाळ
बोलके ते नयन ,हसने ते लडिवाळ

आनंद गगनाला तोकडं ठरवू लागला
क्षणोक्षणी मनाला माझ्या फसवू लागला

त्या अनोख्या नात्याची आता उब कळली
वाटलं आज खऱ्या प्रेमाची जादू कळली

हळूहळू आप्तजनांशी पहिली भेट घडवली
सगळ्यांच्या मनात ती हळूच दडली

पण नशीब मोठं मजेशीर असतं
आणि सुखाशी त्याचं वैर असतं
ताटातुट झाली दोन भावनांची
एक झालेल्या दोन निष्पाप जिवांची

आता मात्रा तुम्ही कंटाळला आहात
नेहमीचा विषय पाहून झोपाळला आहात
पण ती काल परत भेटली हो.......
अकस्मात ड्रॉवरमधनं अवतरली
पहिली काव्यक्षरं पाहून मन कोण आनंदले
खरंच पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले..

Wednesday, August 22, 2007

आपले (अति)गतिमान आयुष्य...

खरं तर आयुष्य म्हणजे एक भोवरा आहे
गतिमान रहा, नाहीतर काळाचा पहारा आहे

गती घेता घेता तर उडालो आम्ही हवेतच
अहंकारी पंखाना फ़क्त क्षितीजाचा किनारा आहे

कट,कपट, कसेही करून आहे जिंकायचे
निर्मळ,प्रेमळ, साधा माणूस इथे बावरा आहे

सगळ्याच गोष्टींना आहेत इथे किंमती
सर्वस्व कवडीमोल विकायला माणूस हावरा आहे

कलीने विणले आहे काय सुंदर जाळे
या अमावस्येत मोजकाच रंग पांढरा आहे

रंग बदलून बदलून ओळखच विसरलॊ स्वतःची
शेवटी स्वतःशी इमानदार तोच माणुस खरा आहे

Friday, August 10, 2007

तो फ़क्त एक क्षण (sad version)

नमस्कार मित्रानो.... काही दिवसांपुर्वी मी 'तो फ़क्त एक क्षण ' ही एक कविता लिहिली होती... त्याला एक गुलाबी रंग होता.. आनंदाचा आविष्कार होता... काल मी एक कथा वाचली , त्यातून हे त्या कवितेचं वेगळं रुप चितारावसं वाटलं...

तो फ़क्त एक क्षण , ह्रुदय भेदून गेला
जन्मोजन्मीची गाठ, क्षणात तोडून गेला

ती शांत निजली होती चितेवरी
अन तो गार वारा,मज विझवून गेला

सगळ्या आठवणी धोधो कोसळताहेत
आसवांचे मेघ तो पूर्ण आटवून गेला

वाटलं आत्ता मागनं येउन बिलगशील
ऎवजी भेटला काळ,मजवर तो हसून गेला

नियतीशी त्याचं संधान होतं बहुधा
या विज्ञानयुगातही, मज हतबल करून गेला

रे अभिजित, तू शुन्य आहेस रे काळासमोर
म्हणून अश्रू आवर, तो मज समजावून गेला....

Friday, August 3, 2007

तु गेलिस निघून....

तू आयुष्यात आलीस, स्वप्नांचं दार उघडलं
तु गेलिस निघून, मन मात्र स्वप्नातंच अडकलं

तुझ्यासाठी सगळ्या प्रार्थना केल्या
आता वाटतं, मी नास्तिकच बरा नव्हतो का

तू आलिसच का एका झऱ्यासारखी
मी वाळवंटात अतृप्तच बरा नव्हतो का

फ़क्त हसुन तू फ़ुलं उधळायचीस
त्या काट्यांपेक्षा मी निष्पर्ण बरा नव्हतो का

तुझी चूक नाही अन माझीही नाही
आपल्याला भेटवणाऱ्या नशिबाचीही नाही
पण वाटतं, मी एकटाच सुखी नव्हतो का..

जाताना तू जगणं घेउन गेलीस
हं .. मी मेलेलाच बरा नव्हतो का..

मुन्नाभाई...

नमस्कार मित्रानो... संजू बाबाला झालेल्या शिक्षेवरुन ही कविता मला सुचली ...मला जे वाटते ते मी लिहिलं , चू-भू माफ़ असावी.. ..

मुन्नाभाईंचे दिवस फ़िरले
झाले सगळे राज्य खालसा
खरी गांधिगिरी शिकायला
तुरुंगात निघाला जलसा

जनता खूप हळहळली
त्यांची निर्मळ इच्छा तुटली
त्यांची तरी काय चूक हो
चित्रपटातली भुमिका पटली

शस्रं देणाऱ्याला जन्मठेप
अन घेणाऱ्याला काहीच नाही
तेव्हा जो माणुसकी विसरला
माफ़ी मागताना त्याला लाजच नाही

त्याने दीड वर्ष भोगले
निष्पाप पूर्ण जन्म भोगत आहेत
रडेल मुन्ना आणि चार दिवस
ते कधीचे अश्रूच बघत आहेत

म्हणून मुन्नाने ही अग्निपरिक्षा द्यावी
निर्मळ सोने होण्यासाठी शिक्षा घ्यावी
सुप्रीम कोर्ट वाचवेलही सुद्धा
पण त्याने न्यायाचीच दिक्षा घ्यावी
मग नंतरचा मुन्ना खरा निरागस असेल
स्वतःच्या नजरेत निर्दोष असेल...

Tuesday, July 10, 2007

एक नवीन ओळख...

आयुष्य उजळवणाऱ्या त्या प्रकाशाला ओळखा
तमोवृत्ती सोडून कर्तृत्वाच्या दिवसाला ओळखा

नटश्रेष्ठांच्या क्षणिक पराक्रमावर काय जाता
त्या पडद्यामागच्या खऱ्या माणसाला ओळखा

स्वप्नं पाहायला कोण नाही म्हणतंय
पण झेपेची उंची दाखवणाऱ्या आकाशाला ओळखा

या बहुरुपी दुनियेत अनेक मुखवटे भेटतील
खरं रुप असलेल्या डोळ्यांच्या आरशाला ओळखा

आपण हरतोय म्हणून इतरांवर काय जळता
शुन्यातून जिंकवणाऱ्या प्रयत्नांच्या पावसाला ओळखा

शर्यतीला जिवघेणी हेच विशेषण का लावता
आधी प्रतिस्पर्ध्यात लपलेल्या माणसाला ओळखा

Monday, July 2, 2007

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही

Tuesday, June 26, 2007

देव आणि 'TV'

देवाने विचार केला, TV घेउन यावा
एवढं त्यात काय आहे, आपणही बघावा

सकाळी भाविक प्रवचनं बघून
देव मोठा खुश झाला
एकापेक्षा एक भेसुर बाबा पाहून
मात्र स्वतःच थोडासा घाबरला

नंतर लागल्या मुख्य बातम्या
ब्रेकिंग न्यूजने धक्काच दिला
आपली मुर्ती दुध पिते कशी
तो स्वतःही विचारात पडला

आल्या मग पौराणिक मालिका
सादर कथा त्या अनामिका
तासभर करमणुकीनंतर कळले
अरे हा वठवतोय आपलीच भुमिका!!

दुपारी होता सनीचा पिक्चर
ते पिक्चर एकाहुन एक बंपर
अचाट शक्तीने देवच वरमला
आता आपलं कसं, विचार करु लागला

त्यालाही मंदिरात जाताना पाहून
देवाच्या जीवात जीव आला
हिरोईनच्या मागे तो आलाय
हा छोटासा तपशील विसरला

मग 'K' सिरियल्स सुरु झाल्या
अफ़लातून स्त्रियांच्या कथा आल्या
नात्यांच्या गोत्यात तो फ़सला
अन फ़ारच संभ्रमात पडला
सत्तरच्या 'बा'ला पंचवीसची पणती
प्रेरणाच्या नवऱ्यांची नाही गिनती
सुनेपेक्षा सासू सुंदर कशी अन
तिनदा मरुन कुणी जिवंत कशी

प्रश्न त्याला सुटता सुटेना
अनोख्या खेळाचे नियम कळेना

पण त्याला एक समाधान झाले
मनुष्यकल्पनेचे कौतुक वाटले
आपली 'क्रिएशन' मोठी हुशार
'विश्व'कर्मा म्हणून त्यास धन्य वाटले

Friday, June 22, 2007

आयुष्य तेच आहे..

संगीता जोशी यांच्या 'आयुष्य तेच आहे' या गझलेवरुन सनिल पांगे यांनी 'मराठी कविता' कम्युनिटी वर चारोळी श्रुंखला सुरु केली आहे... त्यातील माझा अल्पसा सहभाग आपल्यासाठी सादर करतो आहे॥

आयुष्य तेच आहे
कर्तव्याचा मुक्तछंद आहे
उमटले चार निस्वार्थ शब्द
तर ग्रंथ हा मोलाचा आहे

आयुष्य तेच आहे
साश्रु निरोप आहेत
निष्पाप त्या मनाचे
नशिबावर आरोप आहेत

आयुष्य तेच आहे पण
मला त्यानी बदलवलंय
सोपं आहे रुप बदलणं
आरशालाही मी फ़सवलंय..

आयुष्य तेच आहे
डोळ्यात लपलेली स्वप्नं आहेत
हसलो मी चारचौघात जरी
एकांतात हसणारे फ़क्त अश्रु आहेत

आयुष्य तेच आहे
सुखाचे चटके आहेत
दुःखाचे मलम आहे
आपलेच शब्द अन आपलेच अर्थ आहेत

आयुष्य तेच आहे
स्वप्नांचे क्रिकेट आहे
जिंकलो तर ऑस्ट्रेलिया
हरलो तर भारत आहे

आपली शेवटची भेट
शेवटची ती गोड आठवण
आयुष्याच्या या ग्रिष्मातला
तो शेवटचा मुग्ध श्रावण

तू अलगद हात धरलास
मन अलगद आकाशी उडालं
तुझ्या अस्मानी डॊळ्यांमधे
माझं आयुष्य सामावलं

तू अलगद हात धरलास
जणु परिसस्पर्श झाला
संथ, निश्चल जीवनात
चैतन्याचा झरा आला..

तू अलगद हात धरलास
अलगद बाहुत शिरलीस
तुझ्या आरस्पानी मनात
मला दडवून गेलीस...

आयुष्य तेच आहे
उधार श्वास आहेत
तु गेलिस निघून तरी
तुझेच भास आहेत

आयुष्य तेच आहे
स्वप्नांची आरास आहे
रोज नवीन सजावट
हीच मजा खास आहे

आयुष्य तेच आहे
सगळ्यांना हसवतो आहे
डोळ्यात ढग साकळलेत तरी
मुखवट्याला हसणेच आहे

आयुष्य तेच आहे
माळलेले गुलाब आहेत
उमललेले हास्य आहेत
दडलेले काटेही आहेत.

आयुष्य तेच आहे
एक जादुचा खेळ आहे
वेदनेला अलगद विसरण्यासाठी
स्वप्नांचे संमोहन आहे

आयुष्य तेच आहे
नवीन नाती जोडणे आहे
जुनी द्रुढ करणे आहे
यातच स्वतःलाही जपणे आहे

आयुष्य तेच आहे
स्वप्नांमागे धावायचे आहे
ती भासतात मात्र दुर
पण त्यातच तर खरी मजा आहे

Sunday, June 17, 2007

परत रात आली..

परत रात आली, सुगंधी स्वप्नं घेऊन
तिला भेटायचं एकांती, सर्व बंधनं तोडुन

चांदण्याही उतरल्य़ा होत्या मग धरणीवर
कसं राहवेल त्याना,चंद्राला मजसवे सोडुन

खरं तर पावसालाही सांगुन ठेवलंय
बरसू नकोस, ती येण्याची वेळ सोडून

दुसरी स्वप्नंही रागावली,त्याना जागाच नाही
काय करु, आता राहवेना तिला सोडुन

अखंड लयलूट झाली मग प्रेमभावनांची
ओथंबली पहाट, गेली नेत्री दव सोडून

मनाला आहे परिसस्पर्श हा पुरेसा
नाही कुणात जादू ही, एक तिला सोडून

नाही म्हणता म्हणता,
परत रात सरली, गेली जीव अडकवून
परत रात सरली, मला एकटं सोडून

Friday, June 1, 2007

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला

पावसाचं काय, तो नेहमीच येतो
प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला

चांदण्यातही आता मला तीच दिसते
जणू तो चंद्र मला फ़सवून गेला

देवळातही दुसरं काही मागवेना
नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला

मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो
अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला

शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..

Sunday, May 20, 2007

हैदराबाद बॉम्बहल्ला .. एक विचार..

दिनांक १८ मे २००७, स्थळ हैदराबाद ,दुपारी २ च्या सुमारास मशिदीत जमलेल्या भाविकांवर भ्याड बॉम्बहल्ला झाला..
अतिरेक्यांच्या अंध, तत्वहीन हेतुंच्या पाठपुराव्यासाठी आणिक काही निरपराध सोंगट्यांसारखे उडवले गेले... खरंच माणसाला माणसाची किंमत उरलेली नाही... स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी या सुंदर जगाचा ध्वंस करण्याचा हक्क कुणी दिला यांना.. अशाच एका खेळणं बनलेल्या मनुष्याचा आत्मा हे भेसुर द्रुश्य बघुन सगळ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय...

लख्ख, सुंदर दिवस होता
अचानक रात्र झाली
प्रार्थना तर केली देवाची
सैतानाची हाक आली

मी कधी केले
कुणाचे टीचभर नुकसान
माझ्याच का नशिबी
विनाशाची वाट आली

स्वप्नांचे काय होणार
घराचे हाल कोण सोसणार
एका क्षणात भविष्य चिरडत
ती भेसुर घडी आली

धर्माचे गुणगान फ़क्त
अंध अतिरेकीच ते भक्त
मनुष्यधर्माची जाण कधी
कुणा का न आली

राजकारणाचे युद्ध सारे
कुणी तरी हारणारच
पण न खेळणाऱ्यांच्या माथी
कशी काय शिक्षा आली

पेटवा माणुसकीची होळी
पडू द्यात आहुत्या
स्वतःवर वेळ आल्याशिवाय
तुम्हास माणसाची किंमत न आली

काय मिळवाल तुम्ही
शाप सोडुन काही मिळणार नाही
काय जिंकाल तुम्ही
पायाखाली प्रजाही उरणार नाही
विनाशाचा मार्ग आहे हा
स्वतःहुन तो पत्करु नका
निरपराधावर लादु नका
अतिरेकी धुंदीत कळणार नाही
मृत्युची पावलं कधी धावत आली...

Wednesday, May 16, 2007

वावटळ- गझल (एक प्रयत्न)

उकरलेलं मन तो सारवत होता
निश्चल स्वप्नांना परत चालवत होता

कुणी ध्वस्त केलं सुंदर ते जग
विखुरलेल्या आठवणी तो आवरत होता

चेहऱ्यावरचं हसु पळवलं कुणीतरी
नेमकं उलट्या दिशेने तो धावत होता

आकाशालाही वाटला का त्याचा हेवा
मनाचं गळकं छप्पर तो बुजवत होता

झगमगाटात दिपले होते त्याचे डॊळे
शेवटचा दिवा तो आता मालवत होता

मंद वावटळीत भरकटले होते शब्द
जुनी ओळख म्हणुन त्याना बोलवत होता

Monday, April 30, 2007

देवा, घे एकदा अवतार!!

देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
इथे मनुष्याचे राज्य
मंदिरही त्याचीच एक रचना

फ़क्त पाप धुवायचे काम देवाकडे
लडिवाळ ते अभिषेकादी साकडे
परत निघतसे नवीन पाप कर्मण्या
संपता पुण्याचे इंधन, येई मग हवना

दानपेटीस मिळते लाच दहा रुपयांची
बाहेर उभ्या देवाची सोय नाही खायची
रोज भजन असे भिकाऱ्याच्या श्रवणा
एवढे पुण्य असुन का ती वंचना

नुसतीच गीता वाचून कसा मिळनार स्वर्ग
चाललात का कधी परोपकाराचा मार्ग
तहानलेल्याची भागवलीत का कधी तृष्णा
ढोंगी उपासाच्या कसल्या हो वल्गना

देवळात असे भक्तांची वर्गवारी
भक्त तोच महान ज्याचा खिसा भारी
मोठी मजेशीर असे ही संरचना
दुकानदार पुजारी,भक्तीचा भाव उणा

म्हणुन देवा, घे एकदा अवतार
थांबव ही भक्तिची उसनवार
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
माणुसकी जागव रे प्रत्येक मना

Sunday, April 15, 2007

सखे, तुझ्यासाठी

बोलशील ना मज संगे, सखे तू
ऎकवशील ना ह्रुदयगीत मज एक दिन तू

आजकाल फ़ितुर झाली स्वप्नही तुला
राहशील ना त्या स्वप्नमहाली एक दिन तू

जपेन तुझ्या आसवांना मोत्यांसारखे
त्या शिंपल्याचा अवसर मज देशील ना तू

थांबवेन या काळाच्या प्रवाहाला
या अनोख्या संगमास देशील ना प्रत्यक्ष रुप तू

काळोख्या रात्री मी चंद्र पेटवत आहे
चांदणी बनून करशील ना मज सोबत तू

उधळेन आनंदाचे रंग सगळीकडे
त्या होळीचे निमित्त बनशील ना तू

बस,या फ़कीर मनाच्या खुप इच्छा नाही
फ़क्त चिरकाल साथ देणारी आठवण बनशील ना तू

Sunday, April 1, 2007

मनाचे उपद्व्याप..

हातात तुझा हात असावा, नयनी सदा तुच असावी
मनाला तुझ्यावाचून चैन पडेना, त्याल सवे सदा तुच हवी

मन धावतं क्षितिजाकडे, नजर त्याची रोखलेली
हाती काही लागेना,त्याला मात्र हीच वेडी आशा हवी

मन कधी ढग बनुन फ़िरतं, तुला शोधत सगळीकडे
चंचल हवेला चुकवत, कारण फ़क्त तुच भिजायला हवी

मन कधी थांबतं, निपचित पडुन राहतं
फ़िरुन थकलेलं, त्याला तुझी एक झुळूक हवी

दिवसभर आठवणींच्या झळा, मग येते गार कातरवेळ
असेनात असंख्य,पण चांदण्यांपैकी त्याला फ़क्त तुच हवी

मन घेतं रुप मग शिंपल्याचं, घेतं सागरात उडी
एकच आशा,किनाऱ्याच्या रुपात तिथे तु असावी

निघतं उत्साहात प्रवासाला, आठवणींची शिदोरी घेउन
कुठे ते ना ठावे, त्याला फ़क्त तुझी सोबत हवी

मन रमतं शब्दांच्या सहवासात, भान हरवतं
तिथेही त्याला अक्षररुपात तुच रेखाटलेली हवी..

Sunday, March 25, 2007

आपला चषक हरवलाय

विश्वचषक तो जिंकण्या निघाले अमुचे शूरवीर
द्रविड तो अग्रस्थानी, सरसावूनी आपुले कमान-तीर

सोबत होत्या शुभेच्छा, होते अपेक्षांचे ओझेही
ज्योतिष्यही पाठिशी, आले यज्ञकर्ते साधूही

अवघ्या देशाचे पाठबळ, आशिर्वादाची भली मोठी शिदोरी
अनुभवही कमी नसे, जगज्जेत्यांनी भरली पोतडी

कॅरिबियनला पोचताच सगळे अस्त्र शस्त्र परजले
विंडिजला धूळ चारली, हॉलंडपुढेही आवेशात गरजले

वाटले, अहा, काय जंगी सुरुवात झाली
कप नाही, पण सेमी फ़ायनल तर नक्कीच आपली झाली

पण, पण नशिबाने ऎन वेळी इंगा दाखवला
नशिब म्हणता की डेव्हिडने मदमस्त गोलियाथ हादरवला?

उमटले पडसाद, त्या यःकश्चित ढोनीच्या घरापुढे
तरीही धीर मंडळीस, खेळतील नक्कीच यापुढे

मागल्या वेळेसही होती अशीच डळमळीत सुरुवात
पण झुंजार दादांनी मारले फ़ाइनलपर्यंत हात

बर्म्युडाविरुद्ध फ़ुकलेले रणशिंग ऎकुन सर्व सुखावले
पण हाय, श्रीलंकेपुढे कागदी धुरंधर पत्त्यांप्रमाणे कोसळले

अब्ज जनता दिःड्मुढ झाली,त्यांचे देव हरले
दोघांनी सोडले प्राण, उरलेले जखमा कुरवाळीत बसले
(आजच टाइम्स मधे न्यूज वाचली)

दोष कुणाकुणाला द्यावा,स्वतःच म्हणती आम्ही त्या लायक नाही
कॅचेस सोडुन हसता लेकहो, तुम्हाहून कुणी नालायक नाही
(बांगलादेश विरुद्ध ढोनीने मुनाफ़च्या बोलिंगवर कॅच सोडली तो क्षण. त्या बॅट्समनने मग पुर्ण मॅच काढली..)

ब्रॅंड ऍंबेसेडर म्हणुन दिवसरात्र झळकत राहणार
पैसा धुळीसारखा उडतो, मैदानावर पायधूळ उगाच कोण झाडणार

परत नवी सुरुवात करण्याची हीच वेळ आहे
भ्रष्ट नीती डावलून पारदर्शकतेची आली वेळ आहे
राखेतून फिनिक्सचा जन्म होण्याची आता गरज आहे
दुर्दम्य इच्छा, निष्ठा अंगी बाणवण्याची गरज आहे

वाटत असेल, मीच का बरळतोय, सगळ्याच्या ह्याच भावना हो..
स्वप्न सुरु होताच भंगले, अवघा देश जागा झालाय
काय करावं, शेवटी आपला चषक हरवलाय, आपला चषक हरवलाय...

Friday, March 23, 2007

स्वप्न

काल समोरच्या वळणावर तू दिसलीस, खुप दिवसानंतर
हर्षले मन, धावत सुटलो मी, त्या आठवणीनंतर

गाठले तुला, हाय, पण ती तू नव्हतीस
परत सगळं जुळवत बसलो,तुटलेल्या स्वप्नानंतर

असं रोजच का होतं, मला उमजत नाही
रोज वाटतं, तू भेटशील त्या वळणानंतर

आठवणींचा पसारा खुप मोठा,आवरणे मला शक्य नाही
नव्या पण कशा येणार, त्याना जागा जुन्या विसरल्यानंतर

माझी अवस्था नदीसारखी, तीसुद्धा धावत असते सागरामागे
तिलाही कल्पना नसते, तो उभा अनंत वळणानंतर

का मी चातकासारखा?, त्यालाही वाट पावसाची
पाउसही तसाच, तोही येतो जमीन होरपळल्यानंतर

नाही म्हणता मी एक भक्तच, पण माझा देव रुसलाय
निरागस मनाची प्रार्थना, ती फ़ळेल फ़क्त भेटीनंतर

बघा माझेही किती सोबती आहेत
भंगलेलं स्वप्न जुळवण्यात सगळे रमले आहेत
स्वप्न खरं होण्याचं स्वप्न आजकाल माझ्या पापण्यात असतं
काय सांगावं, ते प्रत्यक्षात अवतरेलही, डोळे उघडल्यानंतर

Monday, March 19, 2007

senti movie चे रहस्य

अजाण बाळ ते , जन्म होताच रडतसे
जाणता होऊन मग, हसुन अश्रु लपवतसे
थिएटरच्या अंधारात, हा बांध फ़ुटतसे
मन हलकं होताच, परत हसतमुखे तो बाहेर निघतसे

घट्ट दाबलेलं दुःख मोकळं करण्यात,
नाही म्हणता त्या नटाचाही वाटा असतो
हसतात तर लोकं तुमच्या रडण्यालाही
न रडता रडवण्यात, एक सात्विक प्रयत्न असतो

दुःख तर असतंच हो या जगात
समदुःखी कुणी भेटल्यास तेवढंच बरं वाटतं
पिक्चरमधे का असेना,शेवटी आनंदीआनंद दिसतो
स्वप्नं खोटी का असेना,बघताना तेवढंच बरं वाटतं

हीच स्वप्नं मग हसु लेवुन या चेहऱ्यावर सजतात
गोंडस मेक-अप खाली दुःखाचे व्रण हलकेच बुजतात
मनही मरगळ झटकुन मग ऎटित उठतं
आशेची छत्री घेउन तळपत्या उन्हात डौलात बाहेर पडतं

Wednesday, March 14, 2007

एक चित्र

एवढ्यात एक चित्र माझ्या पाहण्यात आलं, त्याला कसला तरी पुरस्कार मिळाला होता. त्यामधे भर उन्हामधे एक छोटं बाळ निपचित पडलं आहे, मृत्युच्या दाराशी जणू. दुष्काळी उन्हाळ्याचा तो एक बळी असावा. आणि एक गिधाड दुरुन त्या मुलाकडे बघत आहे, त्याच्या मरणाची वाट बघत. ते बघून एक विचार आला मनात, तो खाली मांडलाय.


ऊन हसतंय, बेभान हसतंय
एवढं की जमिनीच्या डोळ्यातही पाणी नाही

कुठे आमरस, तर कुठे आईसक्रीम
कुणाकडे मात्र चतकोर भाकरही नाही

कुठे एसी ची थंड झुळुक , फ़्रीजचे गारगार पाणी
मृत्युच येथे कूलर, साधी जगायचीही सोय नाही

फ़िरंगी मंडळीना याचेच मोठे कौतुक
काय समजावं, ही गरिबी एवढी सुंदरही नाही
मोठमोठे पुरस्कार त्या फ़ोटोना लाभतात
जल्लोश करायला येथे स्मशानाचेही भाग्य नाही

Friday, March 9, 2007

मृगजळ

मी तिला रोज पाहतो, पापण्यांच्या आड तिला दडवतो

प्रसन्न सकाळी तिची वाट पाहतो,वाटेवर तिच्यासाठी नयनफ़ुले अंथरतो
ती सहज बागडत येते , मी शांतपणे स्वप्नांचे निर्माल्य गोळा करतो

ती समोर असता नजर हटत नाही,तिची नजर वळता बेभान मन आवरतो
तिच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित,हळुच मनाच्या तिजोरीत साठवतो

काय वर्णावी ती मोहक अदा, जणू परिसाची जादू त्या नयनी
अमृताहून गोड असे वाणी , एका कटाक्षाने मी सुताने स्वर्ग गाठतो

बहुत असती भ्रमर फ़ुलांभोवती,इथे तर साक्षात कमळाचा थाट
प्रत्येक मनी एक आस, मीसुद्धा आशेचा जुगार पणास लावतो

कित्येक रस्तांमधे असा मधेच हरवलो,त्याची मोजदाद कशाला
नवीन खेळ, मात्र कायदे जुनेच, मला परत हरवायला

असु दे तरी, मनाला आवडतो हा फ़सवा लपंडाव
यावेळी तरी पुर्ण डाव जिंकीन, असतो मनी प्रबल भाव
पण पोतडीतला तो धीर,ऎन वेळी चोरवाटे पळ काढतो
उसन्या अवसानाचे ठिगळ जोडुनही, रोज आशेचे लक्तरं फ़ाडतो

म्हणून अद्याप तरी मी तिला रोज फ़क्त पाहतो, पापण्यांसोबत मग मनातलेही दडवतो
वाळवंटात का असेना, मृगजळात पोहण्याचे स्वप्न मात्र रोज पाहतो

आमचा ग्रुप

सप्तरंग,सप्तसुर आणि त्रिताल एकदा सहज एकत्र जमले
उगाच नाही, त्यादिवशी एक अनोखे नाते जन्मले

ऑगस्ट महिन्यातली ती एक शुभ्र सकाळ
नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी ते वीर उभे ठाकले
उगाच नाही,पहिल्याच स्वारीत शत्रुने एक सुंदर कमळ अर्पण केले

उमटत होते नव्या मैत्रीचे प्रसन्न स्वर
जणु पहिल्याच बैठकीत सर्व सुर बरोबर लागले
उगाच नाही,न जोहर ना चोप्रा,पण आमचे पिक्चर हिट झाले

धमाल उधळले रंग,दांडियात तर कधी डिस्क मधे
पुणे,महाबळेश्वरच काय तर कोकणही या खेळात सामील झाले
उगाच नाही शक्य,पण ते दोन क्षणही जणु दिवसभर रमले

दिवसभर असे Dumbciचा गोंधळ, लपाछपी सुद्धा चाले
ऑफ़िस की मस्ती की पाठशाला , कंप्लेंट करणारे सुद्धा थकले
उगाच नाही, या खेळातुनच ब्लॉगसारखे महापराक्रम घडले

रोज एक नवीन प्लॅन आखायचा, रचलेला डाव कधी मोडायचा
पण उत्साह काही कमी होईना, उलट आणखी स्फ़ुरण चढले
उगाच नाही,कधी सात्विक कोजागिरी,तर कधी फ़ॅशन शो मधे फ़ंडू पोशाख चढवले

पुण्यातून निघायच्या दिवशी सगळे जण CCDला जमले
कोरं नातं ताणल्या गेल्यानं मात्र अजुनच घट्ट झाले
उगाच नाही तेव्हा,खळाळून हसतानासुद्धा हळुच डोळे पाणावले

Thursday, March 1, 2007

तमस्तुती - 2

तामसी, पातकी वा घातकी असे त्याचे कौतुक होते
अगाध त्या अंधाराचे चुकुनच कधी स्वागत होते

डोळ्यात प्राण आणुन जग त्याची वाट पाहते
'जीवन'दात्या त्या कृष्णमेघातुन मग आशेची नवी पहाट उगवते
पण अतिथी त्या अंधाराचे चुकुनच कधी स्वागत होते

अथांग सागरास मारली असे मिठी
जिद्दी त्या खलाश्याचे स्वप्न मोठे किती
पण निळ्या राजाची कृपाद्रुष्टी कधी बदलते
दुरवरचा काळा ठिपकाच मग आयुष्याचे निशाण उरते
तरिही अकल्पित त्या अंधाराचे चुकुनच कधी स्वागत होते

सोनेरी दिवसासारखे निर्मळ रुप, चंचल रात्र तिचा मुकुट होते
गुलाबी गालावरची गोड खळी, नाजुक तिळाची अजोड सोबत असते
अवखळ त्या अंधाराचे असे चुकुन कधी स्वागतही होते

शेवटी एक स्मरण आपल्या सावलीचे झाले
तळपत्या उन्हातही दुसरे कोण पाठिशी धाऊन आले होते
पण त्या आजन्म सोबत्याचे मीसुध्दा चुकुनच स्वागत केले होते

Tuesday, February 20, 2007

तमस्तुती

शुभ्र, धवल, निर्मळ, अलांछित, पावन ते अस्तित्व
उज्ज्वल उजेडात दाटले आहे अनिमिष सत्व
पण रात्रिच्या प्रियकराचे जाणले काय कुणी महत्व...

उषःकालाचे ते रक्तिम, पण सोज्वळ रुप
कविजनांस बहु प्रिय,सर्वदा होई त्यास वंदन
पण जन्मदाता काळोख ठरला वैरी
त्या ललाटी कुठे कौतुकाचे ओळभर चंदन

वर्मी लागती तिक्ष्ण नयनबाण
सौंदर्याचे जणु ज्योतिर्मय़ी प्राण
आणिक अचुक करिती शरसंधान
आगंतुक त्या काजळाचे कुणा अवसान

मैलोनमैल असे भटकंती, दिमाखदार गाडीचे काय करावे वर्णन
साधक ते काळे रक्त,संपेपर्यंत कुणा असे त्याची जाण

अंधारखोठडीचे भय कैद्यास,तोच अंधार त्याचा मित्र होता
मनुष्यकरणीच तारक वा मारक, उगा दोष त्याला का देता..


(जसे सुचेल तसे आणखी रचत जाईन)..

Tuesday, February 13, 2007

ती

ती एक चांदणी, नकळत क्षितिजावर आली, स्वप्नाळु ते आकाश,
अनोळखी झाले तारे
मनाच्या मरुस्थ्लाचे नंदनवन व्हायला एकच कारण पुरे

ती एक प्राजक्ता, अलवार मनात शिरली, धुंद बहरला शिशिर,
निर्माल्याचेही झाले सोने
मनाच्या वहीत जपुन ठेवण्यासारखे पिंपळपान जुने

ती एक श्रावणसर, चिंब रंगवुन गेली, पहिल्या पावसातले इंद्रधनुष्य,
पुर्ण झाले आयुष्याचे कोलाज
आठवणिंच्या रेखिव नक्षिला चढला नवा साज

ती एक ज्योती, मायेची हळुवार नवी उब, अश्रुही मुक्त हसले ,
भावनांना सापडली नवी वाट,
गुलाबी स्वप्नांतुन जागी होतेय आगळी पहाट

तीच माझी अर्चना, निस्सिम,निष्पाप भक्ती
परमेश्वरास एकच साकडे, ते निर्मळ हास्य कायम ठेवण्याची दे मज शक्ती

Monday, February 5, 2007

खऱ्या प्रकाशाचे तेज

वीज आली गावोगावी, जग उजळून निघाले
उदीमधंदा वाढिस लागला,मनुष्यजीवन ढवळून निघाले

खेड्यापाड्यात अधिकरी वर्ग फ़िरे,दाखवित झगमगत्या जिवनाचे स्वप्न
परंतु दारिद्र्यास रोषणाईचे काय कौतुक, पोट भरण्याची आशा जिथे भग्न

अशाच एका वृध्द माऊलिस पटवून सांगत होते साहेब एक
हसतमुखे ती वदली, मान्य आहे साहेब मुद्दा तुमचा प्रत्येक

पण लख्ख प्रकाशात बघायचं काय, प्रश्न पडतो मज एक क्षण
दारिद्र्याचे अलंकार ल्यालेल्या या घरात नसे एकहि सौंदर्यकण

अंधारातच भासे या संसाराची कांती उजळ
कुणास हवे आगंतुक प्रकाशाचे काजळ
यापरि रोजगाराचा फ़क्त एक दिवा साहेब तुम्ही प्रज्वलित करा
जीवन जगण्याची स्वप्नं बघणाऱ्या आम्हाला तोच प्रकाश खरा

Friday, February 2, 2007

प्रकाशाचे मनोगत

काल 'प्रकाश' भेटला होता,
समोर बघुन खिन्न हसला होता.

म्हणाला आजकाल कुणी फ़ारसं विचारत नाही,
सगळ्याना शॉर्टकट हवा, प्रयत्नांना कुणी आचारीत नाही.

विजयाची धुंदी चढली आहे लोकांना, नैतिकतेला कोण जुमानतं
दुसऱ्याना तुडवुन पुढे जातात, माणुसकीला कोण ओळखतं
भ्रष्टाचार, गुन्हेगारी झाली रोजचीच गोष्ट
देशासाठी प्राण देणाऱ्या 'मानवां'चे दैवी विचार आता कोण आठवतं

आता सुंदर वाटणारं हे क्षणभंगुर जग, अहंकाराच्य़ा पायावर किती दिवस टिकेल
कुणितरी मला मनापासुन हाक मारु द्या, अंधारलेल्या या जगाची पुनर्बांधणी मीच सुरु करेल.

Thursday, February 1, 2007

चातक

तुझं आगमन ,शुभ्र माझ्या अस्तित्वावर मुक्त रंगांची उधळण!!

कोरा आयुष्याचा कॅनव्हास, कोरं प्रेमाविण मन,
स्निग्ध भावनांचा कुंचला, उमटले गुलाबी क्षण

हर्षित मनातली पहिली नाजुक आठवण,
जन्मभर साजरा करण्यासारखा अलौकिक सण

पहिल्या स्पर्शाची ती सुखद अनामिक जाण
आठवतं तुझ्या माथ्याचं पहिलं अवघ्राण

ह्रुदयिच्या ईश्वराला साक्षी ठेवुन घेतलेला प्रण
उमटू देणार नाही तुझ्यावर दुःखाचा एकही व्रण

परवा नक्की परत येईन म्हणून तुझं जाताना एकदा डोळाभर पाहुन जाणं,
त्या सोमवारच्या पावसाची वाट बघणाऱ्या चातकाला आजन्म उपाशी ठेवुन जाणं.

Tuesday, January 30, 2007

आठवणींचे जग

आठवणींचे जग किती अनोखं
गुंतलो एकदा की खरं जग पारखं

सापडतो कधी सानपणचा चॉकलेटचा बंगला
गावाच्या मध्यभागी असणारा अमुचा इवलसा इमला

डोळ्यांपुढे सरकते मास्तरांची छडी
मित्रांसोबत चोरुन पेरु खाण्यातली गोडी

भेटतात आईवडिलांगत प्रेम करणारे शिक्षक
टिळकांच्या भूमिकेसाठी कौतुक करणारे प्रेक्षक

ऎन मध्यान्ही रंगलेला क्रिकेटचा डाव
टुर्नामेन्ट जिंकताना घेतलेली विजयी धाव

पहिला नंबर आल्यावर मिळालेलं बक्षिस
दीड मार्क कापले म्हणून मास्तर वाटायचे खवीस

उशीरा उठलो म्हणून मिळायचा धम्मकलाडू
बॅटसाठी हट्ट करताना फ़ुटलेलं खोटं रडू

कधी दिसतं आजीच्या हातचं थालिपिठ
मुंजीच्या वेळेस आईनं कौतुकानं लावलेली तीट

अचानक ओळख दाखवतात दडलेल्या स्म्रुती
मनात जतन करुन ठेवलेले क्षण तरी किती

असे माझे दिवास्वप्न कितीदा भंगती
मॅनेजर अचानक उभा असे संगती
नाईलाजाने coding साठी पुन्हा हात सरसावतात
आयुष्याची debugging उद्या पुन्हा करू असं मनाला समजावतात!!