Tuesday, March 23, 2010

पणती

मनाच्या कोनाड्यात
लाजरीशी पणती..
मधेच खुदकन हसते ..
अन लगेच पदरानी हसू विझवते ..

मी पण तिच्या खोड्या काढतो.
कधी बदकन तेल ओततो ..
लहान मुलासारखं तिचे गाल धरून
तिची काजळी काढून देतो ..

ती पण वस्ताद आहे ..
मला दिसेनासं झालं,
की मुद्दाम गायब होते..
मग मी चाचपडतो.. ठेचकाळतो..
माहीत असतं मला इथेच आहे ..
अन शोधून .. चांगला काडीचा चटका देतो ..
मलाही बोचतो तो ..
शेवटी माझ्या आशेची पणती आहे ती ..

असंच चिडचिड करुन मधे खुप दिवस
कुठे लंपास झाली होती देव जाणे ..
माझा दिवस कसाबसा तग धरून होता ..

अन एकदम तिचा आवाज आला ..
मी इतक्या काळजीत.. अन ही गाणं म्हणत होती ..

"जीने के लिए सोचा ही नही .. दर्द संभालने होंगे..
मुस्कुराए तो मुस्कुराने के .. कर्ज उतारने होंगे.. "