Monday, May 5, 2008

अनिमिष आस...

मनाला जगायची अनिमिष आस असू दे
या घरात तुझीच देखणी आरास असू दे

तूच मनमंदिरातले चित्पावन निरांजन
या ज्योतीस कधी न लागो कणभर लांछन
शांत तेवणारा,कोवळासा एक श्वास असू दे
...

आयुष्य अजुन काय,तुझेच सुरमयी गीत
प्रत्येक समेवर सुस्वर नांदते अपुली प्रीत
तुजसवे नाचता मंजुळ पदन्यास असू दे
...

शब्दाशब्दातून साकरायचंय मूर्त तुला
अर्थाअर्थातून समजायचंय सार्थ तुला
माझ्या हर कवितेला तुझाच प्रास असू दे
...


--अभिजित -- ४-५-०८

Thursday, May 1, 2008

जपानी कविता ..

हे हे .. नाव वाचून गंडलात ना ... अहो काय झालं की २ महिने टोकियो ला राहण्याची संधी मिळाली ... आणि बरंच सांगून झालं इकडून तिकडून की जपान वर लिहा लिहा .... आळशीपणात ते ढकललं पुढे पुढे ..पण आता आम्हालाच इकडून ढकलून देण्याचा कट रचला जातोय .. त्याना यश मिळायच्या आधी लिहून घ्यावं म्हंटलं ... ... चला तर मग थोडं 'गुण'गान करावं.... जास्त टवाळक्या करू नयेत म्हणे कुणाच्या .. त्यात हे तर आमचे अन्नदाता ... (आम्ही अजूनही भारतीय जेवणच घेतो .. बरेच प्रयत्न झाले आम्हाला जपानीझ खाऊ घालण्याचे .. पण आमच्या(की त्यांच्या) अरसिक चवीमुळे आम्ही ते शिताफ़ीने परतवून लावले .. )

असो . खुप विषयांतर झालं .. चला मग जय निहोन ... हे जपानचे दुसरे नाव .. लाडके म्हणा लागल्यास.. याचा अर्थ म्हणजे उगवता सूर्य .. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतातच ना .. ..

हे काही शब्द जपानच्या झुंजार वृत्तीला अर्पण ...


देशाविषयी कुठल्या ,काय बरं मी लिहावे
नतमस्त्तक होऊन,आईस या मी पूजावे

थकतील निहोनप्रती तुमच्या बहू कल्पना
अशी नितांत मेहनत अन प्रखर देशभावना

आदर औचित्य वाखाणण्यासारखे इथले
नम्रपण आगळे जाणण्यासारखे इथले

उगवत्या सुर्यासम लढाऊ मनोवृत्ती
मध्यान्हासम चौकस चिकित्सक वृत्ती
संध्येसारखी गोरी नटमोगरी वेशवृत्ती
निशेसारखी सहज चंचल खिलाडूवृत्ती

नेत्रदीपक तंत्रज्ञान सहज सजवती
रुसुबाई निसर्गाला लीलया मनवती

थोडं रोबोटसारखे अतिसुरळीत जीवन
पण यातच दडलंय त्यांच यशसंजीवन

देशाविषयी या अजून काय बरं मी लिहावे
इथल्या वास्तव्याचे हे सुंदर क्षण रोज वेचावे

-- अभिजित - १-५-२००८ ..

Wednesday, April 30, 2008

एक सवय लागलीय मला..

एक सवय लागलीय मला..
तुझ्या असण्याची , तरी नसण्याची
तुझ्या बोलण्याची , तुझ्या हसण्याची
एक सवय लागलीय मला...

लिहायचं म्हणून लिहत नाहीये
रुपकं उगाचच चुरगाळत नाहीये
तुला परत परत आठवायची
नकळत त्या ओघात लिहण्याची
एक सवय लागलीय मला...

माहित्ये तू मला वेडा म्हणशील
खुळा नाद चला सोडा म्हणशील
पण ह्या अनामिक नादिष्टपणाची
त्या जादूई स्वरांमधे वाहण्याची
एक सवय लागलीय मला...

असेल कितीक मधे तो दुरावा
हाच उलट सांधणारा एक दुवा
असेच हवे तसे अर्थ काढण्याची
कळूनही सगळे, न उमजण्याची
एक सवय लागलीय मला...

Monday, April 28, 2008

सफ़र ..

इन सुनसान गलियों मे न जाने क्या अपनासा है
शायद इन मे छुपा कोई धुंधला एक सपनासा है

सांवलीसी मुरत कॊई,आस पास कही
सायें सी लिपटी,सीने के आस पास कही
ये ख्वाब इस शाम मे भी,एक आहना सा है
(आहना -> सुरज की पहली किरणें)

एक वो रंगीन तितली कही उडती दिख गई
छुईमुई यादें , छन से हसकर झलक गई
ये सन्नाटा भी अब लगे, एक हसीं तरानासा है

हर वक्त क्यू उनकी याद गुनगुनाती रहती है
अभी से फ़िर मिलनेकी झंकार सुनाती रहती है
बडा बेसब्र ये सफ़र भी,बेगाना,इक दिवानासा है

Friday, April 25, 2008

अजुन काय व्याकरण मागू..

समईभर घर
मायेचं साजूक तेल
उत्फ़ुल्ल मनांच्या वाती
अजुन किती प्रकाश मागू...

अनमोल तिचे बोल
काळापार तो काळ
नादमयी तिचा श्वास
अजून कुठलं गाणं मागू...

चार वाक्यांची कविता
प्रोत्साहनाचे अलंकार
कौतुकाची रुपकं
शिकवणुकीची यमकं
खट्याळवृत्ती उत्तरं
अन ह्या निर्मळ प्रेमामुळे
शोभणारी शब्दलक्तरं
अजुन काय व्याकरण मागू...

-- अभिजित -- २५ - ४ - ०८