आपणा सर्व मान्यवरा़स
देतो शब्द-मौक्तिक घास
चुकता काही.या पामरास
क्षमा करावी
मी नाही कुणी तपस्वी
नाही मी कुणी मनस्वी
पण तरिही थोडं शैशवी
बोलुन घेतो
मज भेटता छान हसती
पाठ फ़िरता मज कोसती
स्वतःशीच इमानी नसती
काही लोक
काहीना फ़क्त पैसाच सख्खा
हावलोभाचा दास तो पक्का
प्रेमावरही हिशोबाचा बुक्का
सांडला असे
म्हणती आज उपवास
साजुक खिचडीचेच घास
दोन कवळ मात्र भुकेल्यास
कोण देई
सगळेच तसे थोडे स्वार्थी
नसावे दुष्कर्माचे सारथी
जीवनाभ्यासाचे विद्यार्थी
आपण निरंतर
दडलाय अहं मनात
अवघड अशा कोनात
आणणे त्यास न्यूनात
सोपे नाही
बाणवा अंगी अभिमान
मनी प्रभुचे अधिष्ठान
ठेवा परोपकाराची जाण
इतुकेच पुरे...
No comments:
Post a Comment