Thursday, November 22, 2007

कवी - कवयित्रीचा मिळून स्वयंपाक ..

कविता माझी , अन कविता तिची
स्वयंपाकात यमकाची फ़ोडणी साची

लाटणे अलंकाराचे, वृत्ताचे पोळपाट
साजूक रुपकं ,भरल्या कवितेचं ताट

किचनमधे चालला गोंधळ दोघांचा भारी
यमकाचं निवडण, कधी मतल्याची तयारी

चेष्टा मस्करीचा नवा बाज असा
गालावर उमटलेला शब्द पिठाचा ठसा

भांडणातही पद्याची घेतात हो साथ
त्या वाक्यांतही शब्द जुळविती आठ
वांग्याचे तुझे हे भरीत
जसे लंगड्या शार्दुलाचे विक्रीडीत
तुझ्या भाज्याना तर काय द्यावी उक्ती
ही तर जशी कवितेत यमकांची अतिशयोक्ती

पण जमतो शेवटी फ़र्मास बेत
जेवू मग एकमेकाना दाद देत
प्रास , यमकाचा रेडी दाणेकूट
मस्त जमतं बघा मग मेतकूट .. ...