Friday, August 10, 2007

तो फ़क्त एक क्षण (sad version)

नमस्कार मित्रानो.... काही दिवसांपुर्वी मी 'तो फ़क्त एक क्षण ' ही एक कविता लिहिली होती... त्याला एक गुलाबी रंग होता.. आनंदाचा आविष्कार होता... काल मी एक कथा वाचली , त्यातून हे त्या कवितेचं वेगळं रुप चितारावसं वाटलं...

तो फ़क्त एक क्षण , ह्रुदय भेदून गेला
जन्मोजन्मीची गाठ, क्षणात तोडून गेला

ती शांत निजली होती चितेवरी
अन तो गार वारा,मज विझवून गेला

सगळ्या आठवणी धोधो कोसळताहेत
आसवांचे मेघ तो पूर्ण आटवून गेला

वाटलं आत्ता मागनं येउन बिलगशील
ऎवजी भेटला काळ,मजवर तो हसून गेला

नियतीशी त्याचं संधान होतं बहुधा
या विज्ञानयुगातही, मज हतबल करून गेला

रे अभिजित, तू शुन्य आहेस रे काळासमोर
म्हणून अश्रू आवर, तो मज समजावून गेला....

No comments: