Thursday, January 24, 2008

काळ...

हर एक क्षणावर काळाचे राज्य आहे
तुमचं आणि त्याचं नातं अविभाज्य आहे

काळ म्हणा,नियती म्हणा, वा अजुन काही
न थांबता,ठरल्या मार्गाने तो चालत राही
खेळू नका तयासंगे,फ़ारच तो व्रात्य आहे
हर एक क्षणावर...

क्षण सुटला हातून,परत तो येणे नाही
काळाची देण होती ती, परत तो देणे नाही
या खेळात त्याच्या आळशीपणा त्याज्य आहे
हर एक क्षणावर...

प्रसन्न असेल तर ,काळ झरझर सरतो
रागावला तर, तुम्हांस जर्जर करतो
क्षणात राजा , क्षणात भिकारी
क्षणात रया , क्षणात लाचारी
हाक प्रेमळ त्याची , शिवी मात्र अर्वाच्य आहे

हर एक क्षणावर काळाचे राज्य आहे
तुमचं आणि त्याचं नातं अविभाज्य आहे

1 comment:

Anand Kale said...

अतिउत्तम... अप्रतिम....
यापुढे शब्दच कमी पडत आहेत...